हिंसाचारग्रस्त इराकमध्ये एका बांधकाम कंपनीत काम करणाऱ्या ४० जणांचे अपहरण करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या प्रकरणात लक्ष घातले असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आमच्यासाठी भारतीयांची सुरक्षा हाच प्राधान्यक्रम आहे असे त्यांनी सांगितले.
सुन्नी अतिरेक्यांनी मोसुल येथे अपहरण केलेल्या ४० भारतीयांपैकी एक जण त्यांच्या तावडीतून पळाला असून तो बगदादमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे, असे परराष्ट्र खात्याचे सय्यद अकबर उद्दीन यांनी सांगितले. अपहरण करण्यात आलेले कामगार सुरक्षित असून आम्ही अतिरेक्यांशी सर्व प्रकारे वाटाघाटीचे मार्ग अवलंबित आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, १६ भारतीयांना इराकमधून हलवण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील आठ जणांना बायजी तेल कारखाना परिसरातून तर आठ जणांना अनबार येथून बाहेर काढून बगदाद बाहेर रवाना करण्यात आले. दरम्यान, इराकचे अध्यक्ष मलिकी यांनाच पदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिकेने तीनशे लष्करी सल्लागार पाठवण्याची घोषणा केल्यानंतर इराकी सैन्यदलांचे मनोधैर्य उंचावले असून उत्तर बगदादमध्ये सैन्याने शुक्रवारी पुन्हा सुन्नी अतिरेक्यांविरूद्ध उभे ठाकण्याचे ठरवले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ३०० अमेरिकी सल्लागार पाठवण्याचे जाहीर केले असले तरी त्यांनी शिया सरकारच्या आग्रहास्तव हवाई हल्ले करण्याचे मात्र नाकारले आहे. पंतप्रधान नुरी अल मलिकी यांनी सुन्नी अल्पसंख्याकातील नाराजीची भावना दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ओबामा यांनी सांगितले. दरम्यान, सुन्नी अतिरेक्यांनी पुन्हा एकदा बायजी तेल कारखाना ताब्यात घेण्यासाठी जमवाजमव सुरू केली आहे, असे सुन्नी अतिरेक्यांनी घेराव घातलेल्या एका इराकी अधिकाऱ्याने सांगितले. कर्नल अली अल कुरेशी यांनी सांगितले की, सुन्नी अतिरेकी नव्याने हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान, बगदादमधील दूतावासाच्या सुरक्षेसाठी ऑस्ट्रेलियाने सैनिक पाठवले आहेत, असे संरक्षण मंत्री डेव्हिड जॉनस्टन यांनी सांगितले.
बगदादच्या उत्तरेला सामरा भागात अतिरेक्यांची पीछेहाट होत असल्याचे एका मलिकी समर्थकाने सांगितले. सरकार योजनाबद्ध हल्ला करून त्यांचा बिमोड करील मोसुल शहर आयसिसने ताब्यात घेतले होते, पण तेथेही त्यांची आगेकूच रोखली आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे. सामरा येथे इराकचे पन्नास हजार सैन्य अतिरेक्यांचा बिमोड करण्यात गुंतले आहेत
.दरम्यान, फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री लॉरेंट फॅबियस यांनी सांगितले की, सुन्नी जिहादींचा मुकाबला करण्यासाठी  शिया पंतप्रधान नूर अल मलिकी यांच्यासह किंवा यांच्याशिवाय एकजुटीचे सरकार इराकमध्ये असावे असे आम्हाला वाटते.