जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने अनेक देशांकडे मदत मागितली. परंतु पाकिस्तानला तोंडावर पडावं लागलं. चीन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशाने पाकिस्तानची साथ दिली नाही. परंतु मुस्लीम देशांकडून पाकिस्तानला मात्र एक सूचना करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीने(यूएई) पाकिस्तानला भारतासोबत बॅकडोअर डिप्लोमसीचा वापर करण्याची सूचना दिली आहे. तसंच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कठोर भाषेच्या वापरावरही आळा घालण्यास सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री आदिल अल जुबेर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला बिन अल नाहयान यांनी पाकिस्तानचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानने भारताशी अनौपचारिक चर्चादेखील करण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानचे वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यून यांनी यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. त्यांनी आपल्या एकदिवसीय दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशई आणि सैन्यदलाचे प्रमुख कमर जावेद बाजवा यांची भेट घेतली होती.

यावेळी त्यांच्यात झालेल्या चर्चेला गोपनीय ठेवण्यात आलं होतं. तसचं परराष्ट्र मंत्रालयाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच या बैठकीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नेत्यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची इच्छाही व्यक्त केली. तसंच काश्मीरमध्ये लादण्यात आलेले निर्बंध कमी करण्यासाठी भारताला तयार करू परंतु पाकिस्तानलाही काही अटींचं पालन करावं लागेल असंही यावेळी सांगण्यात आलं. पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पाकिस्तानकडून सुरू असलेले शाब्दिक हल्ले बंद करण्यात यावे असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. परंतु पाकिस्तानकडून या अटींना नकार देण्यात आला. तसंच काश्मीरमधील निर्बंध हटवल्यानंतरच अन्य बाबी शक्य होतील, असंही पाकिस्तानकडून सांगण्यात आल्याचं एक्सप्रेस ट्रिब्यूनने म्हटलं आहे. दरम्यान, 19 सप्टेंबर रोजी पंतप्रधान इम्रान खान सौदी अरेबियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.