कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि हसन लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा याचे सेक्स स्कँडलचे २९०० व्हिडीओ बाहेर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे प्रज्ज्वलच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सभा घेतली होती. आता उत्तर प्रदेशमधूनही अशीच एक बातमी समोर आली आहे. समाजवादी पक्षाचे मोठे नेते आणि अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांच्या मुलाचे स्विमिंग पूलमधील मुलींबरोबरचे फोटो व्हायरल झाले आहेत. शिवपाल यादव यांचा मुलगा आदित्य यादव उत्तर प्रदेशच्या बदायू लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभा आहे. ७ मे रोजी इथे मतदान होणार असून त्यापूर्वीच फोटो व्हायरल झाल्यामुळे आदित्य यादव यांना याचा खुलासा करावा लागला.

आदित्य यादव यांनी बुधवारी (दि. १ मे) पत्रकार परिषद घेऊन या फोटोंमागची कहाणी सांगितली. हे फोटो त्यांचेच असल्याचे त्यांनी मान्य केले. “हे फोटो २०१२ चे असून माझ्या महाविद्यालयीन जीवनाच्या काळातले आहेत. या फोटोमधील मुली माझ्या मैत्रिणी आणि बहिणी आहेत. कदाचित यापुढच्या काळात एआयद्वारे तयार केलेले माझे काही व्हिडीओही बाहेर येऊ शकतात”, असे संकेतही आदित्य यादव यांनी यावेळी दिले.

‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”

प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडलच्या व्हिडीओमधील काही स्क्रिनशॉट एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो शेअर करून विरोधकांनी भाजपावर निशाणा साधला. त्यानंतर लगेच शिवपाल यादव यांच्या मुलाचे फोटो बाहेर आले. एक्सवर महेंद्र विक्रम नावाच्या अकाऊंटवरुन पहिल्यांदा हे फोटो शेअर केले गेले, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. महेंद्र विक्रमने या फोटोंसह एक कॅप्शन दिली, त्यात म्हटेल की, बदायूची जनता लवकरच याला ओळखायला लागेल. मुलगा आहे आणि त्याच्याकडून कधी चूक होऊन जाते. फोटो खरे असून ते २०१२ चे आहेत.

आदित्य यादव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपाच्या आयटी सेलवर टीका केली. ते म्हणाले, “हा माझ्या गोपनियतेचा भंग आहे. राजकीय स्वार्थापोटी इतक्या खालच्या थराला उतरणे योग्य नाही. भाजपाच्या आयटी सेलने माझी बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल केले आहेत.”

अमित शाहांचा डीपफेक व्हिडीओ शेअर केला म्हणून झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंटवर कारवाई; खात्यावर Account Withheld चा संदेश!

आदित्य यादव यांच्या आरोपानंतर भाजपाचे बदायूमधील उमेदवार दुर्गविजय सिंह शाक्य म्हणाले, “आम्ही अजून ते फोटो पाहिले नाहीत. पण आम्ही त्यांची मुलाखत पाहिली. आदित्य यादव यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, त्यांचे काका (दिवंगत नेते मुलायम सिंह यादव) म्हणाले होते की, मुलं तर मुलं असतात, त्यांच्याकडून चूक होऊन जाते. यापेक्षा मला जास्त काही बोलायचे नाही.”

बदायू लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. भाजपाकडून शाक्य, बसपाकडून मुस्लीम खान आणि समाजवादी पक्षाकडून आदित्य यादव मैदानात आहेत. २०१९ सालच्या निवडणुकीत भाजपाच्या संघमित्रा मौर्य यांनी १८ हजारांच्या मताधिक्याने इथे विजय मिळविला होता.