परदेश दौऱयांवरून विरोधकांनी आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेळोवेळी लक्ष्य केले आहे. पंतप्रधान देशात कमी आणि परदेशात जास्त असतात, त्यांना देशातील सामान्य नागरिकाची काहीच पडलेली नाही, काही दिवसांनी देशातील नागरिक पंतप्रधानांचे नाव देखील विसरतील, आता खुद्द पंतप्रधानांच्याच ‘घरवापसी’ची गरज आहे, अशा एकना अनेक टीकांचा भडीमार विरोधकांनी मोदींवर केला. पण पंतप्रधान कार्यालयाने मोदींच्या कार्यतत्परतेचे कौतुक करत गेल्या १९ महिन्यात मोदींनी एकही दिवस सुटी घेतली नसल्याची माहिती दिली आहे. माहितीच्या अधिकाराच्या(आरटीआय) अंतर्गत करण्यात आलेल्या एका अर्जाच्या उत्तरात पंतप्रधान कार्यालयाने हे उत्तर दिले आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदींनी किती दिवस सुटी घेतली. त्यांनी किती परदेश दौरे केले याचा तपशील या अर्जाद्वारे मागविण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना पंतप्रधान कार्यालयाने मोदींनी आजवर एकही दिवस सुटी घेतली नसल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला. गेल्या १९ महिन्यांत मोदींनी १८ विदेश दौरे केले त्यात एकूण ८९ दिवस मोदी देशाबाहेर राहिले, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली. १८ विदेश दौऱयांमध्ये अफगाणिस्तान आणि रशियाचा समावेश नाही. मोदी सध्या काबुलमध्ये आहेत.
अफगाणिस्तानमध्ये शुक्रवारी मोदींच्या हस्ते अफगाणिस्तानच्या नव्या संसद भवनाचे उदघाटन केले. अफगाणिस्तानच्या या संसद भवनाच्या उभारणीत भारताने सहकार्य केले आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या उत्तराने परदेश दौऱयांवरून मोदींवर हल्ला चढवणाऱयांना चपराक बसल्याची भावना भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे.