नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धार्मिक राजकारण करत असून हिंदू-मुस्लीम हा त्यांचा अजेंडा असल्याची टीका काँग्रेसने केल्यानंतर भाजप नेत्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा हवाला देत ते कधीही हिंदू-मुस्लीम राजकारण करणार नाहीत, त्यांनी कोणताही भेदभाव न करता समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी काम केले आहे, असे प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले होते की, त्यांनी हिंदू-मुस्लीम कार्ड खेळायला सुरुवात केली तर ते सार्वजनिक जीवनासाठी योग्य राहणार नाहीत. त्यावरून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी त्यांच्यावर धार्मिक राजकारणाचा आरोप केला. ‘मोदींची हमी’ आणि ‘४०० पार’ या घोषणांना अपयश आल्याने मोदींकडे हिंदू-मुस्लीम राजकारणाशिवाय कोणताही अजेंडा नाही, असे काँग्रेसने सांगितले.
भाजपने काँग्रेसचे हे आरोप फेटाळून लावले. माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, मोदींनी त्यांच्या सर्वसमावेशक कारभाराने सांप्रदायिक तुष्टीकरण संपवले. त्यांच्या असंख्य कल्याणकारी योजनांचा लाभ गरीब जनतेला कोणत्याही जाती, धार्मिक किंवा प्रादेशिक पक्षपातांशिवाय झाला आहे. त्यांच्या योजनांचा सर्वांनाच फायदा झाला हे मोदींचे टीकाकारही नाकारू शकत नाहीत, असे भाजप नेते म्हणाले.
हेही वाचा >>> सत्तेसाठी भाजपला ७९ जागा कळीच्या
भाजपचे प्रवक्ते आर पी सिंग यांनी दावा केला की ते काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते मुस्लीम आरक्षण आणि वैयक्तिक कायदे मजबूत करण्याच्या बाजूने बोलले आहेत. त्याला पंतप्रधानांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात वैयक्तिक कायदे बळकट करण्याचे आश्वासन दिले आहे आणि त्यात शरियाच्या काही भागांची अंमलबजावणी होत असल्याचा आरोप केला आहे. राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी मुस्लीम आरक्षणाला अनुकूलता दर्शवली आहे, असे सिंग यांनी सांगितले.
काँग्रेसचा पंतप्रधानांवर खोटारडेपणाचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटारडे आहेत, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला. पंतप्रधान हिंदू-मुस्लीम राजकारण करत नसल्याचे असत्य सांगत आहेत. १९ एप्रिलपासून ते दररोजच खोटे बोलत आहेत, असे रमेश म्हणाले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही मोदींवर टीका केली. त्यांचे प्रचाराच्या भाषणात विकासाच्या मुद्द्यांऐवजी इतर मुद्देच अधिक असतात. हिंदू-मुस्लीम, मटण-चिकन याच मुद्द्यांवर त्यांचे भाषण असते. गेल्या १० वर्षांत केलेल्या कामांवर पंतप्रधान मते का मागत नाहीत, असे खरगे म्हणाले.
मुंबई : महाराष्ट्रात निवडणूक प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यातून पुन्हा मुस्लीमद्वेष बाहेर पडला. काँग्रेसवर टीका करताना मोदी धादांत खोटे बोलत आहेत, मात्र त्यांच्या थापेबाजीला मतदार आता बळी पडणार नाहीत, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मोदी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहेत. मुस्लिमांना संपत्ती वाटणार हे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कुठेच नाही, हे स्पष्ट असतानाही ते पुन्हा पुन्हा तसा अपप्रचार करत आहेत, असे पटोले म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच देशातील १४० कोटींहून अधिक लोकसंख्या एक मानली आहे. मात्र विरोधकांनी त्यांच्यावर हिंदू-मुस्लीम राजकारण करत असल्याचा आरोप केला. नरेंद्र मोदी यांनी कधीही हिंदू-मुस्लीम राजकारण केलेले नाही. – शाहनवाझ हुसेन, प्रवक्ते, भाजप