देश-विदेशातील कोटय़वधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाराणसी येथील काशी-विश्वनाथ धामचे १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पुरातन काशी-विश्वनाथ मंदिर परिसरात पाच लाख चौ. फूट जागेवर हा विस्तारीकरण प्रकल्प साकारण्यात आला असून एका वेळी ७५ हजार भाविक परिसरात सामावले जाऊ शकतील. घाटावरून गंगा नदीचे पवित्र जल घेऊन काशी विश्वेश्वरास अभिषेक करण्याची सुविधा आता भाविकांना उपलब्ध  होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे या प्रकल्पाचे सादरीकरण झाले होते आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी त्यांनी केलेल्या सूचनांनुसार प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ८ मार्च २०१९ रोजी प्रकल्पाचा शिलान्यास करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी ८०० कोटी रुपये खर्च आला आहे.

या पुरातन काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी १६६९ मध्ये केला होता. मंदिरामध्ये हजारो भाविक दर्शनाला येतात. परिसरातील अरुंद गल्ल्या, दुकाने, सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेली व्यवस्था आणि मंदिराचा गाभारा व मंदिर परिसरातील जागा गर्दीच्या तुलनेत अपुरी होती. सोमवार, श्रावण व मार्गशीर्ष महिना आणि अन्य वेळीही हजारो भाविकांना रस्त्यांवर रांगेत उभे राहावे लागत होते. घाट व परिसरात त्यांना पुरेशा सोयीसुविधाही नव्हत्या. त्यामुळे मंदिर परिसराचा कायापालट करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. आता मंदिराची चार भव्य प्रवेशद्वारे असतील. मंदिराभोवतालची ३१४ घरे, इमारती सहमतीने बाजारभावापेक्षा दुप्पट दराने भरपाई ठरवून ताब्यात घेण्यात आल्या. १४०० दुकानदार, फेरीवाले, विक्रेते यांना पर्यायी जागा व भरपाई देण्यात आली. त्यामुळे जागा संपादित करण्याचा मुद्दा न्यायालयात फारसा अडकला नाही, असे वाराणसीचे आयुक्त दीपक आगरवाल यांनी सांगितले.

ज्येष्ठ वास्तुविशारद विमल पटेल यांनी या प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. आता भव्य गर्भगृह व परिसर, चार प्रवेशद्वारे, प्रसादालय, सत्संग सभागृह, वृद्धाश्रमासह अनेक वास्तू असतील. घाट परिसरातही शौचालयांसह अन्य सुविधा, मंदिर परिसरात येण्यासाठी सरकते जिने, सामान ठेवण्यासाठी लॉकर्स आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.