काश्मीरमधील पुलवामातील एका क्रिकेट स्पर्धेच्या सुरुवातीला पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रगीत लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी पुलवामामध्ये क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना होता. या सामन्याआधी पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रगीत लावण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरच्या राष्ट्रगीताचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले. या व्हिडिओमध्ये शाईनिंग स्टार पँपोर आणि पुलवामा टायगर्स या दोन संघांचे खेळाडू दिसत आहेत. हे सर्व खेळाडू निळ्या रंगाच्या जर्सींमध्ये दिसत आहेत.

पुलवामातील ज्या स्टेडियममध्ये पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रगीत लावण्यात आले, ते स्टेडियम पदवी महाविद्यालयाच्या जवळ आहे. पुलवामातील पदवी महाविद्यालय गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनांमुळे चर्चेत आहे. पुलवामातील स्टेडियमजळच करीमाबाद गाव आहे. या गावात दहशतवाद्यांचे वास्तव्य आहे. ‘क्रिकेट सामन्याआधी पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रगीत लावले जाणे, यात काहीच नवीन नाही. अनेकदा क्रीडा स्पर्धांमध्ये, सामन्यांआधी पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रगीत लावले जाते. क्रिकेट स्पर्धांमध्ये तर हा प्रकार हमखास घडतो. मात्र ज्यावेळी अशा घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर होतात, तेव्हाच त्यांची चर्चा होते,’ असे पुलवामातील स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका तरुणाने सांगितले.

याआधी दीड महिन्यापूर्वी दोन स्थानिक संघांनी सामन्याआधी पाकिस्तानचे राष्ट्रगीत लावले होते. मध्य काश्मीरमधील कानगन जिल्ह्यात हा प्रकार घडला होता. यानंतर एका स्थानिक संघाचा पाकिस्तानी संघाच्या जर्सीतील व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंना अटक केली होती.