पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत प्रतिपादन

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत शनिवारी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जगाला वाढत्या प्रतिगामी आणि कट्टरतावादी विचारांचा धोका असल्याचे निदर्शनास आणले आणि तर्कसंगत,  पुरोगामी विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेपुढे हिंदीत केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी, लोकशाही मूल्ये, भारताची आर्थिक प्रगती, करोना विषाणू साथीनंतरची जागतिक अर्थव्यवस्था, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, अफगाणिस्तानातील राजकीय उलथापालथ अशा अनेक विषयांना स्पर्श केला. अफगाणिस्तानातील परिस्थितीबाबत बोलताना मोदी म्हणाले, अफगाणिस्तानची भूमी दहशतवादाचा फैलाव करण्यासाठी किंवा दहशतवादी कृत्यांसाठी वापरली जाणार नाही, याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे.

अफगाणिस्तानातील महिला आणि अल्पसंख्याकांच्या स्थितीबद्दलही पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘अफगाणिस्तानातील महिला आणि अल्पसंख्याकांना मदतीची आवश्यकता आहे. त्यांना मदत करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.’’ अफगाणिस्तानातील परिस्थितीचा वापर कोणताही देश आपल्या राजकीय स्वार्थासाठी करणार नाही, याबद्दलही आपल्याला सतर्क राहावे लागेल, असेही मोदी यांनी नमूद केले.

 संयुक्त राष्ट्रांच्या ७६ व्या आमसभेत मोदी यांनी प्रतिगामी आणि कट्टरतावादी विचारांच्या वाढत्या धोक्याबद्दल  भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘आज जग प्रतिगामी विचार आणि कट्टरतावादाच्या वाढत्या धोक्याचा अनुभव घेत आहे. अशा परिस्थितीत जगाला विज्ञानावर आधारित तर्कशुद्ध आणि पुरोगामी विचारांची गरज आहे.’’

जागतिक नेत्यांपुढे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा उल्लेखही पंतप्रधान मोदी यांनी केला. काही देश त्यांनाही दहशतवादाचा मोठा धोका आहे, हे माहीत असूनही दहशतवादाचा वापर राजकीय अस्त्र म्हणून करीत आहेत, अशी टीका मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख टाळून केली.

याशिवाय, मोदी यांनी सर्वांना शुद्ध पाणी पुरवण्याच्या दिशेने भारत करीत असलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख केला. विकास हा सर्वसमावेशक, सर्वव्यापी, सार्वत्रिक आणि कोणत्याही देशाच्या प्रथम प्राधान्यक्रमावर असावा, असेही मोदी म्हणाले.

अफगाणिस्तानबद्दल सतर्कता आवश्यक! 

अफगाणिस्तानातील महिला आणि अल्पसंख्याकांना मदतीची आवश्यकता आहे. त्यांना मदत करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. तेथील परिस्थितीचा वापर कोणताही देश आपल्या राजकीय स्वार्थासाठी करणार नाही, याबद्दलही आपल्याला सतर्क राहावे लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत स्पष्ट केले.

काही देश त्यांनाही दहशतवादाचा मोठा धोका आहे, हे माहीत असूनही दहशतवादाचा वापर राजकीय साधन म्हणून करीत आहेत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान