मोदी यांच्या शून्य उत्सर्जन घोषणेचे ब्रिटिश पंतप्रधानांकडून स्वागत

भारताने २०३० पर्यंत आपली इंधनाची निम्मी गरज अपारंपरिक ऊर्जेतून भागविण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाच्या समतोल वापरातून २०७० पर्यंत शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्याची घोषणा केली असून त्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वागत केले आहे. ग्लासगो येथील जागतिक परिषदेत सोमवारी मोदी यांनी भारताची भूमिका मांडताना ही घोषणा केली असून भारतातर्फे तसे प्रथमच जाहीर करण्यात आले आहे.

२०३० पर्यंत भारताची इंधनाची निम्मी गरज ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांतून भागविली जाईल, असेही मोदी यांनी स्पष्ट केले आहे. हे लक्ष्य साध्य करण्याची पंचसूत्री मोदी यांनी ग्लासगो परिषदेत मांडली. त्यात २०३० पर्यंत भारताची जिवाश्मरहित इंधननिर्मितीची क्षमता ५०० गिगावॉटपर्यंत वाढविण्याचे सूतोवाच केले आहे. या कालावधीपर्यंत भारतात अपेक्षित असलेल्या कार्बन उत्सर्जनात एक अब्ज टनांची घट करण्याचा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला आहे.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जॉन्सन म्हणाले की, भारताने २०३० पर्यंत आपली इंधनाची निम्मी गरज अपारंपरिक ऊर्जेतून भागविण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. यातून कार्बनचे उत्सर्जन कित्येक अब्ज टनांनी कमी होणार आहे. जगभरात हवामान बदल रोखण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला यामुळे मोठी मदत होणार आहे.

भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य जाहीर केले आहे. म्हणजेच आता जगभरातील ९० टक्के आर्थिक सत्तांनी असे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार केला आहे. हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी ब्रिटन भारतासोबत काम करील. सीओपी २६ मध्ये आम्ही त्यावर चर्चा केली आहे.  – बोरिस जॉन्सन, ब्रिटनचे पंतप्रधान

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prime minister of india narendra modi emission targets the prime minister of the united kingdom boris johnson at the world conference akp

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या