निरोपाच्या सुरांच्या पाश्र्वभूमीवर राजन यांचे सूचक वक्तव्य

रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाच्या मुदतवाढीला मी नकार दिल्यानंतर अनेक वृत्तपत्रात माझ्यावर स्मृतीलेखवजा मजकूर छापून आला. त्यामुळे मी कायमचा दुरावल्याचे मानू नका. मी अजून अडीच महिने गव्हर्नरपदी आहे आणि त्यानंतर जगात कुठेही असलो तरी अधिक वेळ भारतातच राहाणार आहे, असे सूचक वक्तव्य रघुराम राजन यांनी बुधवारी केले.  राजन यांची सध्याची मुदत ४ सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर या नात्याने दुसऱ्यांदा काम करण्याची इच्छा नसल्याचे राजन यांनी अलीकडेच जाहीर केले.  त्याचे तीव्र पडसाद जागतिक स्तरावरही उमटले. त्याचप्रमाणे देशातील राजकीय, आर्थिक, औद्योगिक क्षेत्रांतही हा निर्णय खेदजनक असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. राजनविरोधी काही नेत्यांनी मात्र त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत निरोपाचा सूरही आळवला होता. या पाश्र्वभूमीवर राजन यांनी हे वक्तव्य केल्याने पदावरून पायउतार झाल्यावरही सरकारच्या आर्थिक धोरणांचे कठोर विश्लेषकाची भूमिका ते पार पाडतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

‘असोचेम’(असोसिएटेड चेम्बर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया)च्या बंगळुरू येथे झालेल्या कार्यक्रमात थेट मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की, मी खूप वाचणार आहे आणि लिहिणारही आहे. तसेच यासारख्या कार्यक्रमातही सहभागी होणार आहे.

चीनची जागा घ्यायला १५ वर्षे लागतील!

चीनकडे आपण स्पर्धक म्हणून पाहू नये तर त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असे स्पष्ट मत राजन यांनी मांडले. चीन ज्या जागी आहे तिथे पोहोचायला आपल्याला दहा ते पंधरा वर्षे लागतील, असेही ते म्हणाले. चीन पूर्ण समस्यामुक्त आहे, असे नव्हे, पण चीनने गेल्या तीन दशकांत प्रयत्नांमध्ये जे सातत्य ठेवले आहे आणि ज्या ध्येयानुरूप ते ठामपणे वाटचाल करीत आहेत, त्यापासून आपण प्रेरणाच घेतली पाहिजे, असेही राजन म्हणाले.