माझ्यावर हवी तेवढी टीका करा, पण देशातील शेतकऱ्यांचे, गरिबांचे, आदिवासींचे, दलितांचे प्रश्न दडपण्याचा प्रयत्न करू नका, असे प्रत्युत्तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना दिले आहे.
आपल्या देशात खरे सहिष्णू कोण आहेत तर ते काँग्रेस पक्षातील लोक. कारण ते अशा व्यक्तीला सहन करत आहेत, ज्याला पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे. ते जर अशा व्यक्तीला सहन करू शकतात, तर ते जगातील कोणतीही गोष्ट सहन करू शकतात, या शब्दांत अभिनेते अनुपम खेर यांनी नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. कोलकात्यातील एका कार्यक्रमात त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. त्याला राहुल गांधी यांनीही अनुपम खेर यांचे नाव न घेताच प्रत्युत्तर दिले.
राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री किंवा इतर कोणीही माझ्यावर हवी तेवढी टीका करावी. माझ्याबद्दल हवे तेवढे बोला. पण देशातील शेतकऱ्यांचे, गरिबांचे, आदिवासींचे, दलितांचे, मजुरांचे प्रश्न दडपण्याचा प्रयत्न करू नका. गरिबांच्या, दलितांच्या प्रश्नांबद्दल मी आवाज उठवत आलो आहे आणि यापुढेही आवाज उठवत राहीन. कोणी माझ्यावर कितीही टीका केली, तरी मी त्यांचे प्रश्न मांडतच राहणार.