संसदेत गुरूवारी सादर झालेला रेल्वे अर्थसंकल्प हा भविष्यवेधी आणि प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आगामी काळात रेल्वे हा देशाच्या आर्थिक प्रगतीतील महत्त्वपूर्ण घटक ठरावा, यासाठी अर्थसंकल्पात स्पष्ट अशी उद्दिष्टे आखण्यात आल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

मोदी यांनी याबद्दल ट्विटरवरून बोलताना रेल्वे अर्थसंकल्प हा भविष्याचा वेध घेणारा आणि प्रवासी केंद्रित असल्याचे सांगितले. याशिवाय, अर्थसंकल्पात दूरदृष्टी आणि ठोस योजनांचा मिलाफ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रेल्वेसाठी हा क्षण म्हणजे सर्व जुन्या गोष्टी धुऊन टाकणारा आहे. यामुळे आतापर्यंत निव्वळ नव्या गाड्या आणि डब्यांपुरता मर्यादित असलेल्या अर्थसंकल्पातील चर्चेचा लंबक थेट व्यापक बदलांपर्यंत पोहचला आहे. अर्थसंकल्पात रेल्वेची सुधारणा आणि आधुनिकीकरणाला केंद्रस्थानी ठेवण्यात आल्यामुळे मला विशेष आनंद झाल्याचे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले . सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवतानाच यामध्ये वेग, स्तर, सेवा आणि सुरक्षा या सर्व गोष्टी एकाच रूळावर ठेवण्यात आल्याने हा रेल्वे अर्थसंकल्प अनेक अर्थांनी वेगळा ठरत असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली.