राजस्थानमध्ये एकीकडे नाट्यमय राजकीय घडामोडी घडत असताना आयकर विभागाकडून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. संबंधित नेत्यांनी भारताबाहेरील केलेल्या व्यवहारांची आयकर विभाग चौकशी करत आहे. दरम्यान काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हा भाजपाचा डाव असल्याचा आरोप केला आहे.

आयकर विभागाने काँग्रेस नेते धर्मेंदर राठोड यांच्या निवासस्थानावर छापा टाकला आहे. धर्मेंदर राठोड हे अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय समजले जातात. याशिवाय आयकर विभागाने राजीव अरोरा यांच्या निवासस्थानीदेखील छापा टाकला आहे. राजीव अरोरा एका ज्वेलरी कंपनीचे मालक असून त्यांनी कर चुकवल्याप्रकरणी छापा टाकण्यात आला आहे. दिल्ली आणि राजस्थानमधील १२ हून अधिक ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत.

राजस्थान, दिल्ली आणि महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणांवर आयकर विभागाकडून ठापे टाकण्यात आले असून जयपूर, कोटा, दिल्ली आणि मुंबईतही तपास सुरु आहे. ही कारवाई कर चुकवल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर करण्यात आल्याचं आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. याशिवाय देशाबाहेर करण्यात आलेले व्यवहारही आयकर विभागाकडून तपासले जात आहेत. आयकर विभागाचे २०० हून अधिक अधिकारी या कारवाईत सहभागी आहेत.

रणदीप सुरजेवाला यांनी यावेळी काँग्रेस नेत्यांच्या घरावर छापे टाकण्यावरुन भाजपावर टीका केली. “आयटी, ईडी, सीबीआय भाजपाचे वकील असून असे छापे टाकून सरकार कोसळणार नाही,” असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ईडीकडून अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांच्या संपत्तीचीही चौकशी सुरु आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. ईडीने आयकर विभागाच्या कारवाईशी याचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.