नवी दिल्ली : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्याच पक्षाला पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे. भारतीयांच्या वंशाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या तमाम नेत्यांनी पित्रोदा आणि काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल केला. हतबल झालेला काँग्रेस या विधानापासून मैलोन् मैल दूर पळाल्याचे चित्र दिसले. अखेर पित्रोदा यांनी बुधवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

एका पॉडकास्टवरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांचे निकटवर्ती असलेल्या पित्रोदांनी टीकेची आयती संधी दिली. ‘‘पूर्वेकडील लोक चिन्यांसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे, उत्तरेकडील लोक गोरे आणि दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात. पण, त्यामुळे काही फरक पडत नाही. आपण सर्व बंधू-भगिनी आहोत’’, असे विधान पित्रोदा यांनी केले. त्यावर तेलंगणातील वारंगळच्या सभेत पंतप्रधानांनी जोरदार हल्लाबोल केला. वर्णाच्या आधारे समाजामध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. पित्रोदांच्या विधानावर राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अन्य भाजप नेत्यांनीही विविध माध्यमांतून पित्रोदा, राहुल गांधी आणि काँग्रेसला लक्ष्य केले.

हेही वाचा >>>Video : “अदाणी-अंबानी पैसे देतात, हे तुम्हाला कसं माहिती?” पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आरोपाला राहुल गांधींचं प्रत्युत्तर

यामुळे कोंडी झालेल्या काँग्रेसने बचावात्मक पवित्रा घेतला. ‘‘पित्रोदांनी दिलेली उपमा अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या विधानाशी काँग्रेस सहमत नाही,’’ असे स्पष्टीकरण पक्षाचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी दिले. पित्रोदांच्या कथित वर्णद्वेषी विधानाबद्दल प्रियंका गांधी-वढेरा यांनाही प्रश्न विचारण्यात आला. त्यांनीही विधान अनावश्यक असल्याचे सांगत थेट टीका करणे टाळले व पंतप्रधानांनी महत्त्वाच्या विषयांवर बोलावे असे म्हटले. दोन आठवड्यांपूर्वी संपत्ती फेरवाटपासंदर्भात वादग्रस्त विधान केल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या पित्रोदा यांनी अखेर बुधवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनाम दिला.

राजपुत्राचे (राहुल गांधी) सल्लागार काका अमेरिकेत राहतात. त्यांनी त्वचेच्या रंगावरून भारतीयांना मोठी शिवी दिली आहे. द्रौपदी मुर्मूही ‘आफ्रिकन’ असल्याचे त्यांना वाटले आणि म्हणून त्यांना (राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत) विरोध केला. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान बिनमहत्त्वाच्या गोष्टींवर फुलटॉस खेळून वेळ वाया घालवतात. त्यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर खेळून दाखवावे. महागाई, महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर भूमिका घ्यावी… तर तुम्हाला खेळता येते असे मी मानेन!- प्रियंका गांधी-वढेरा, काँग्रेस नेत्या