निठारी हत्याकांडातील दोषी सुरिंदर कोली याच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयाने एका आठवडय़ाची स्थगिती दिली आहे. त्याला १२ सप्टेंबर रोजी फाशी देण्यात येणार होते. मात्र न्या. एच. एल. दत्तू आणि न्या. ए. आर. दवे यांच्या खंडपीठाने त्याच्या शिक्षेस आठवडय़ाची स्थगिती दिल्याचे तुरूंग प्रशासनाने सांगितले.
फाशीच्या शिक्षा झालेल्या कैद्यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकांवर खुल्या न्यायालयात सुनावणी व्हावी आणि त्यानंतर फाशीचा निर्णय घेण्यात यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एका प्रकरणी दिला होता. त्यामुळेच न्यायालयाने कोलीच्या फाशीला स्थगिती दिल्याचे समजते. कोलीच्या वकिलामार्फत न्यायालयात फेरविचार याचिका करण्यात येऊ शकते.
सध्या कोलीला मिरत येथील तुरुंगात कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नये म्हणून त्याच्या कोठडीबाहेर सशस्त्र पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे, तसेच सीसीटीव्हीद्वारेही त्याच्यावर नजर ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने रविवारी मध्यरात्री हा आदेश काढल्यानंतर पहाटे १.४० वाजता तुरुंग प्रशासनाला याबाबत कळविण्यात आले. कोलीला फाशी दिल्यात मिरत कारागृहात १९७५ नंतर प्रथमच फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे.