वॉशिंग्टन : अतिशय प्रतिष्ठेच्या स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व गाजवले असून या स्पर्धेच्या आठ विजेत्यांमध्ये सात जण भारतीय वंशांचे विद्यार्थी आहेत. तर एक अमेरिकी विद्यार्थी असून सर्वाना संयुक्तपणे विजेते ठरवण्यात आले आहे. त्या सर्वानाच प्रत्येकी पन्नास हजार डॉलर्स रोख व इतर बक्षिसे दिली जाणार आहेत.

या स्पर्धेच्या ९४व्या वर्षांत प्रथमच दोनपेक्षा अधिक सहविजेते ठरले आहेत. तर २००७ नंतर प्रथमच एरिन हॉवर्ड या एका अमेरिकन विद्यार्थ्यांचा विजेत्यांमध्ये समावेश आहे.

विजेत्यांमध्ये ऋषिक गंधश्री (वय १३, कॅलिफोर्निया), साकेत सुंदर (१३, मेरीलँड), श्रुतिका पाधी (१३, न्यू जर्सी), सोहम सुखठणकर (वय १३, टेक्सास), अभिजय कोडाली (१२, टेक्सास), रोहन राजा (वय १३, टेक्सास), ख्रिस्तोफर सेराओ (वय १३, न्यू जर्सी), एरिन हॉवर्ड (१४, अलाबामा) हे सहविजेते ठरले आहेत.

गंधश्रीने ‘ऑसलॉट’, हॉवर्डने ‘एरीसिपेलास’, सुंदरने ‘बोगनविले’, पाधीने ‘एग्विेलेट’, सुखठणकरने ‘पेंडेलोक’, कोडालीने ‘पलामा’, सेरावने ‘सेरन्युअस’, रोहनने ‘ओडिलिक’ या शब्दांची स्पेलिंग बरोबर सांगितली. सात ते १४ वयोगटांतील एकूण ५६२ विद्यार्थ्यांमधून या आठ जणांची अंतिम फेरीसाठी निवड झाली.

सहा मुलगे व दोन मुली यांनी पाच सलग फेऱ्यांमध्ये ४७ शब्दांचे स्पेलिंग बरोबर सांगितले. त्यामुळे या स्पर्धेचा या वर्षीचा शेवट अभूतपूर्व ठरला.

गेल्या वर्षी भारतीय अमेरिकी कार्तिक नेमानी याने ही स्पर्धा जिंकली होती त्याला ४२ हजार डॉलर्स मिळाले होते. त्याने ‘कोईनोनिया’ शब्दांचे स्पेलिंग अचूक सांगितले होते. २०१७ मध्ये भारतीय-अमेरिकी मुलगी अनन्या विनय हिने ही स्पर्धा जिंकली होती. २०१४-२०१६ दरम्यान या स्पर्धेत सहविजेते होते पण त्यांची संख्या नगण्य होती.

देशोदेशीचे स्पर्धक

या स्पर्धेचे प्रसारण ईएसपीएनवरून करण्यात आले. मेरीलॅण्डमधील गेलॉर्ड नॅशनल रिसॉर्ट येथे ही स्पर्धा घेण्यात आली. मंगळवारी २८ मे पासून ही स्पर्धा सुरू झाली. अमेरिका, कॅनडा, घाना, जमेका यांसह अनेक देशांचे स्पर्धक यात होते.  यातील बहुतांश स्पर्धकांना व्यक्तिगत प्रशिक्षक होते, अनेक महिने त्यांनी तयारी केली होती.