शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलीय. विशेष म्हणजे शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार असून पक्षाने कोणत्याही इतर पक्षासोबत युती केलेली नाही. मात्र भविष्यात युती होण्याचे संकेत पक्षाने दिलेत. यासंदर्भातील एक पत्रकच शिवसेनेचे उत्तर प्रदेशचे प्रभारी विश्वजीत सिंह यांनी जारी केलं आहे. या बैठकीसंदर्भातील माहिती देणारं पत्रक जारी करतानाच या पत्रकामधून शिवसेनेनं उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकावर टीका केलीय. राज्यामध्ये शिक्षण, रोजगार, कायदा सुव्यवस्था यासारखे प्रश्न सध्या सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या कार्यकाळात निर्माण झाल्याचं सांगतानाच भाजपाला धडा शिकवण्यासाठी सर्वच्या सर्व मतदारसंघांमधून शिवसेना उमेदवार देणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१० सप्टेंबर रोजी लखनऊमधील हरतगंज येथे पक्षाच्या उत्तर प्रदेशमधील नेत्यांची बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि पक्षाची वाटचाल कशी असणार यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली. यावेळी उत्तर प्रदेशमधील शिवसेनेचे प्रमुख नेते ठाकूर अनिल सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना उत्तर प्रदेश सरकारमध्ये कायदा सुव्यवस्था सक्षम नसल्याची परिस्थिती आहे, अशी टीका केलीय. उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज सुरु असून महिला आणि मुलींवर अत्याचार होत असल्याची टीका ठाकूर यांनी केलीय.

शिवसेनेने जारी केलेल्या पत्रामध्ये, सरकार ब्राह्मणांविरोधात गैरव्यवहार करत आहे. राज्यामध्ये आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती फारच वाईट आहे. करोना रुग्णांचे मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्यासाठी सामान उपलब्ध होत नव्हतं अशी परिस्थिती आहे. बंद असणाऱ्या शाळाही राज्यामधील विद्यार्थ्यांकडून हव्या तशा पद्धतीने फी घेताना दिसत आहेत. सरकार शिक्षणसम्राटांच्या बाजूने आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही विद्यालयांमधील फी १५ टक्क्यांनी कामी करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र सरकारने कायदा बनवून विद्यार्थ्यांना १५ टक्के फी सवलत दिलीय. उत्तर प्रदेशमध्ये बेरोजगारी आणि महागाईमुळे तरुण मुलं राज्य सोडून जात आहेत. सरकार शेतकरी आणि तरुणांसोबत सावत्र असल्याप्रमाणे व्यवहार करत आहे, असे आरोप करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.

पुढे याच पत्रकामध्ये, शिवसेना उत्तर प्रदेशमधील जनतेचा आवाज बनून त्याच्यामध्ये जाणार. शिवसेना सर्व जागांवर उमेदावर उतरवून भाजपाला धडा शिकवणार आहे. सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये पक्ष बांधणीसाठी समन्वयक नियुक्त करण्यात आलेत. लवकरात लवकर उत्तर प्रदेशमधील शिवसेना नेत्यांचं एक प्रतिनिधी मंडळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन या निवडणुकीसंदर्भात अहवाल त्यांना सादर करणार आहे, असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena to contest for all 403 seats in uttar pradesh assembly elections in 2022 scsg
Show comments