स्पेस एक्स कंपनीने किमान सात अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात घेऊन जाऊ शकेल, अशी सुटसुटीत कॅप्सूल (कुपी) गुरुवारी सादर केली. ही कॅप्सूल पृथ्वीवर कुठल्याही भागात परत येऊ शकते. द ड्रॅगन व्ही २ हे त्या कॅप्सूलचे नाव असून खासगी कंपनीने ती तयार केली आहे.
२०११ मध्ये स्पेस शटल बंद झाल्यानंतर अवकाशवीरांना अवकाशात नेऊन सोडण्यासाठी नवीन व्यवस्था करणे आवश्यक होते. स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी सांगितले, की तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आम्ही हे मोठे पाऊल पुढे टाकले आहे. एक पुढची पायरी आपण गाठली आहे. स्पेस एक्स कंपनीची स्पर्धा बोइंग, सिएरा नेवाडा व ब्लू ओरिजिन या कंपन्यांशी आहे. २०१७ पर्यंत पहिल्या व्यावसायिक उड्डाणात या कंपनीचा सहभाग असेल. आतापर्यंत जगातील अवकाशवीर हे रशियाच्या सोयूझ या अवकाशयानावर अवलंबून होते, त्यात एका व्यक्तीला अवकाशात नेण्यासाठी ७ कोटी डॉलर इतके भाडे आकारले जात होते. द ड्रॅगन व्ही २ ची घोषणा कॅलिफोíनया येथील हाथोर्न येथे भरगच्च पत्रकार परिषदेत त्यांनी केली.
स्पेस एक्सच्या ड्रॅगन या कॅप्सूलने प्रथम २०१३ मध्ये अवकाशवीरांना आवश्यक असलेली साधनसामग्री पुरवली होती. ‘ऑरबायटल सायन्सेस’ या संस्थेने सिग्नस ही कॅप्सूल तयार केली होती पण ती पृथ्वीच्या वातावरणात परतताना जळाली होती.
मस्क यांनी सांगितले, की ही कॅप्सूल हेलिकॉप्टरच्या अचूकतेने पृथ्वीवर कुठेही उतरू शकते. सामान वाहून नेणाऱ्या कॅप्सूल समुद्रात उतरत असत, तसे या कॅप्सूलच्या बाबत होणार नाही. यात रॉकेट इंधन वापरले असून ती पॅराशूटविना स्वत:च्या पायांवर जमिनीवर उतरू शकते. तरीही इंजिनात बिघाड झाल्यास पॅराशूटची सुविधा यातही ठेवण्यात आली आहे. त्याचे उष्णतारोधक कवच अधिक प्रगत असून ही कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकास जोडली जाऊ शकते.
अवकाश स्थानकाला यांत्रिक बाहू काढून या कॅप्सूलला ओढून घ्यावे लागणार नाही हे त्याचे वैशिष्टय़ आहे असे मस्क यांनी सांगितले. तसेच यामुळे अवकाश प्रवासाचा खर्चही कमी होणार आहे. इंधन भरून तुम्ही ही कॅप्सूल पुन्हा पुन्हा वापरू शकता. अग्निबाणांचा वापर मात्र खíचक होता ती पद्धत आता बदलली आहे.
‘पेपाल’चे सह संस्थापक व इंटरनेट उद्योजक असलेल्या मस्क यांनी ड्रॅगन व्ही २ चे चाचणी उड्डाण केव्हा होणार हे स्पष्ट केले नाही. स्पेस एक्सच्या मते ही कॅप्सूल २०१७ पर्यंत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत पोहोचेल अशी आशा व्यक्त केली आहे.
स्पेस एक्स, बोइंग, सिएरा नेवाडा, ब्लू ओरिजिन या कंपन्यांना नासाने प्रगत अवकाशयाने तयार करण्यासाठी लाखो डॉलरचे अनुदान दिले आहे. दरम्यान नासाने म्हटले आहे, की अवकाशात खोलवर जाऊन मंगळावर माणसाला उतरवण्यासाठी २०३० पर्यंत कॅप्सूल रूपातील अंतराळयान तयार करण्यात येईल.