चंदीगडमध्ये आम आदमी पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत चंदीगडमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या मतमोजणीत आपचे जवळपास ८ मते अवैध ठरवण्यात आली होती. परंतु, ही मते आता वैध ठरवून चंदीगडच्या महापौर पदी आपचा उमेदवार घोषित करण्यात आला आहे. पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. लाईव्ह लॉने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंदीगड महापौरपदासाठी पुन्हा निवडणूक न घेता सध्याच्या मतपत्रिकांच्या आधारेच निकाल जाहीर केला जाईल, असं सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर, ३० जानेवारीला झालेल्या मतदान आणि मतमोजणीची संपूर्ण चित्रफीत आणि मतपत्रिकांचे मंगळवारी अवलोकन करण्यात आले. यावेळी अवैध ठरवलेली आठही मते वैध ठरवून पुन्हा मतमोजणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. ही मतमोजणी पुन्हा झाल्यानंतर आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांचा विजय झाला आहे.

याचिकाकर्त्याच्या बाजूने टाकण्यात आलेल्या आठ मतपत्रिकांचा विपर्यास करण्याचा अनिल मसिह यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे खंडपीठाने नमूद केले. “पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी मतपत्रिकेत छेडाछाड झाल्याचे मान्य केले”, असंही खंडपीठाने नोंदवलं.

“पीठासीन अधिकाऱ्याचे वर्तन दोन पातळ्यांवर घसरले आहे. प्रथमतः त्यांच्या वर्तणुकीमुळे, त्यांनी महापौर निवडणुकीचा मार्ग बेकायदेशीरपणे बदलला आहे. दुसरे म्हणजे, या न्यायालयासमोर खोटे निवेदन दिले, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले पाहिजे”, असंही खंडपीठाने म्हटलं.

३० जानेवारी रोजी झालेल्या चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला होता. या निवडणुकीत इंडिया आघाडीतील मित्र पक्षांचा पराभव झाला होता. निवडणूक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांच्यावर फसवणूक आणि बनावटगिरी केल्याचा आरोप करत AAP ने सुप्रीम कोर्टात नव्याने मतदानाची मागणी केली. अनिल मसिह हे सीसीटीव्हीकडे पाहताना मतपत्रिकेवर टिक करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केली होती टीका

चंदीगडमध्ये झालेली निवडणूक ही घोडेबाजार असल्याची टीकाही सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यामुळे आता अनिल मसिह यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court overturns chandigarh mayor polls results declares aap candidate winner sgk
Show comments