बिहारमधील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव सध्या चारा घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात आहेत. तर दुसरीकडे पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही लालूपुत्रात संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे. तेजप्रताप यादव यांच्या वक्तव्यावर लहान भाऊ आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मौन सोडत आमच्या दोघांमध्ये कोणतेच मतभेद नसल्याचे माध्यमांना म्हटले आहे.

माजी आरोग्य मंत्री आणि मोठा भाऊ तेजप्रताप बरोबरील मतभेदावरून रविवारी तेजस्वी यादव यांनीही मौन सोडले आणि भावाबरोबर आपले कोणतेही मतभेद नसल्याचे सांगावे लागले. तेजस्वी म्हणाले की, तेजप्रताप यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या योग्य ठिकाणी चर्चा करून सोडवले जातील. तेजप्रताप यांच्याकडे पक्षातून दुर्लक्ष केले जाते, हा आरोप मात्र तेजस्वी यांनी फेटाळला.

तर दुसरीकडे तेजप्रताप यादव यांनीही तेजस्वी यादव यांच्याबरोबर आपले कुठलेच वाद नसून माध्यमांतून येत असलेले वृत्त त्यांनी फेटाळले. माझा तेजस्वी यांच्याबरोबर कोणताच वाद नाही. माझ्या नाराजीचे प्रमुख कारण हे राजदचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पूर्वे हे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूर्वे हे पक्षाचा कारभार मनमानी पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षाच्या विद्यार्थी संघटनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

रामचंद्र पूर्वे हे पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांबरोबर व्यवस्थित वागत नाहीत. त्यांना शिवीगाळ करता, असे तेजप्रताप यांनी निर्दशनास आणून दिले होते.

लहान भावाबरोबरील संघर्षाबाबत ते म्हणाले की, तेजस्वीबरोबर माझे कोणतेही मतभेद नाहीत. पण पक्षामध्ये काही असे लोक आहेत जे दोन्ही भावांमध्ये भांडण लावू इच्छितात. जर माझे तेजस्वीबरोबर वाद असते तर गांधी मैदानावर झालेल्या मागील वर्षीच्या मेळाव्यात त्यांच्या समर्थनात शंखनाद करून त्यांना सत्तेची गादी सोपवण्याबाबत बोललो नसतो, असे त्यांनी म्हटले.

तेजस्वी हे अर्जुन आणि मी कृष्ण असल्याचे सांगत तेजप्रताप म्हणाले की, अर्जुनकडे सत्ता सोपवून मी स्वत: द्वारकाला जाईल.