विमान प्रवासादरम्यान मोबाईल सेवा ‘कनेक्टिव्हिटी’ला मंगळवारी दूरसंचार आयोगाने सशर्त मंजुरी दिली. यामुळे आता विमान सुरु असताना प्रवाशांना आपला फोन फ्लाईट मोडवर टाकण्याची गरज पडणार नाही. उलट ते फोनवरून कॉल करु शकतील तसेच त्यांना इंटरनेटचा वापरही करता येणार आहे. दूरसंचार आयोगाच्या बैठकीत याला मंजूरी देण्यात आली.

येत्या तीन ते चार महिन्यांत या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. केवळ भारतीय हवाई हद्दीतच याचा वापर करता येणार असून विमानाने ३००० मीटर्सची उंची गाठल्यानंतरच ही कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर केवळ चार ते पाच मिनिटांतच  ३००० मीटर्सची उंची गाठते. या सेवेसाठी सर्विस प्रोव्हायडर्सना वर्षासाठी १ रुपया प्रतिवर्ष या प्रमाणे फी आकारली जाणार आहे. मात्र, त्यासाठी ट्रायच्या कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे.

त्याचबरोबर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) अर्थात ट्रायच्या शिफारशींनाही यावेळी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानुसार, दूरसंचार मंत्रालयाकडून ट्रायच्या अधिनियमानुसार, ग्राहकांच्या हितासाठी त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी लोकपाल स्थापण्यासही मंजूरी देण्यात आली आहे, दूरसंचार सचिव अरुण सुंदरराजन यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

प्रत्येक तिमाहीला सुमारे १ कोटी तक्रारी ट्रायकडे येत असतात. हे प्रमाण खूपच जास्त असून लोकपालच्या निर्मितीमुळे ग्राहकांच्या तक्रारी समाधानकारकरित्या निकाली काढण्यात येतील, असेही यावेळी सुंदरराजन यांनी सांगितले.