कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी भाजपा व आरएसएसची अप्रत्यक्षपणे हिटलरच्या नाझी पक्षाची तुलना करत संताप व्यक्त केला आहे. अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी देशभरातून निधी उभारण्याचं काम केलं जात आहे. यात अनेक ठिकाणी गैरप्रकारही उघडकीस आले असून, स्वामी यांनी थेट जर्मनीत हिटलरच्या काळातील परिस्थितीचा हवाला दिला आहे. “हिटलरच्या काळात नाझींनी जे केलं, ज्यात लाखो लोकांचे जीव गेले. हे सगळं तसंच सुरू आहे,” अशी संतप्त टीका कुमारस्वामी यांनी केली आहे.

कुमारस्वामी यांनी ट्विटस् करत कुणीही आपली मतं मांडू शकणार नाहीत, अशी परिस्थिती भाजपा तयार करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. “असं दिसत आहे की, राम मंदिरासाठी स्वंतत्रपणे देणगी देणाऱ्या व न देणाऱ्यांच्या घरांवर वेगवेगळ्या खूणा केल्या जात आहे. हिटलरच्या शासन काळात जर्मनीमध्ये नाझींनी जे केलं, ज्यामुळे लाखो लोकांचे जीव गेले. हे सगळं तसंच सुरू आहे. जे काही भारतात बघायला मिळत आहे. हे सगळं आपल्याला शेवटी कुठे नेऊन ठेवणार आहे, मला माहिती नाही,” असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- गुलामीच्या मानसिकतेतून इतिहासकारांनी खऱ्या राष्ट्रनायकांवर अन्याय केला, त्या चुका आजचा भारत सुधारतोय : मोदी

देशात अशी परिस्थिती तयार केली जात आहे की, कुणीही आपली मतं मांडू शकणार नाही. जर प्रसारमाध्यमांनी सरकारचे विचार स्वीकारले तर काय होईल, मला माहिती नाही. त्यामुळे अशा परिस्थिती सर्वसामान्य माणसाची भविष्य काय असेल, याचा अंदाज लावणंही अवघड आहे. देशात काहीही घडू शकतं, असे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत,” अशी चिंता कुमारस्वामी यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा- मिथुन चक्रवर्ती भाजपात जाणार?; मोहन भागवतांनी घरी जाऊन घेतली भेट

नाझी पक्षाच्या स्थापनेवेळीच RSSचा जन्म

स्वामी यांनी आरएसएसवरही निशाणा साधला आहे. “जेव्हा नाझी पक्षाची जर्मनीमध्ये स्थापना झाली, त्याच वेळी आरएसएसचा उदय झाला, असं इतिहासकार सांगतात. काळजीचं कारण हे आहे की, जर आरएसएसने नाझी पक्षाची धोरणं लागू करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? देशात आता लोकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले जात आहेत. तो किंवा ती कुणीही खुलेपणाने आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही, अशी स्थिती देशात निर्माण झाली आहे. हे दुसरं काहीही नसून, अघोषित आणीबाणीच आहे,” असा हल्लाबोल कुमारस्वामी यांनी केला आहे.