‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदावरील गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करणारे लोक हिंदुविरोधी असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायझर’ या मासिकातून करण्यात आला आहे. फक्त मनोरूग्ण असणारेच लोक चौहान यांच्या पात्रतेविषयी शंका उपस्थित करू शकतात, असेही मासिकातील या लेखात म्हटले आहे. सरकारने चौहान यांची नियुक्ती केल्यापासूनच काही हिंदुविरोधी शक्तींनी नकारात्मक प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. हे लोक जाणुनबुजून प्रसारमाध्यमांत चौहान यांच्याविषयी अपप्रचार करत आहेत. चौहान यांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कमी असून, राजकीय लागेबांधे असल्यामुळे त्यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचा दावा हे लोक करतात. मात्र, महाभारतासारख्या मालिकेत युधिष्ठिराची भूमिका साकारणाऱ्या चौहान यांच्या कुवतीविषयी शंका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी आत्तापर्यंत १५० चित्रपट आणि ६०० टेलिव्हिजन मालिकांमधून काम केले आहे. त्यांना या क्षेत्रात काम करण्याचा ३४ वर्षांचा अनुभव आहे. चौहान यांच्या कुवतीबाबतच बोलायचे झाले तर, एफटीआयआयमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र जरी आले तरी चौहान सरस ठरतील, असे या लेखात म्हटले आहे.
एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या पाठिंबा दर्शविणाऱ्यांचाही या लेखातून समाचार घेण्यात आला आहे. चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करणाऱ्यांपैकी मृणाल सेन या ‘कट्टर मार्क्सवादी’, गिरीश कर्नाड हे ‘हिंदुंचा तिरस्कार करणारे’, श्याम बेनेगल यांची प्रतिमा ‘भाजपविरोधी’ असल्याचा आरोप संघाकडून करण्यात आला आहे.