“जय श्री राम” घोषणा दिल्याबद्दल बुधवारी बेंगळुरूमध्ये तीन जणांवर हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. विद्यारण्यपुराजवळ दुपारी ३.२० वाजता ही घटना घडली. डी. पवन कुमार, बिनायका आणि राहुल हे तिघेही त्यांच्या कारमधून प्रवास करत होते. कारमधून प्रवास करत असताना ते “जय श्री राम” अशा घोषणा देत होते. यावेळी त्यांना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी थांबवले आणि त्यांच्यावर हल्ला केला. तसंच, त्यांना ‘जय श्री राम’च्या घोषणा न देण्यास सांगितले.

त्यापैकी एकाने या घटनेचा व्हीडिओ रेकॉर्ड केला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “जय श्री राम, नाही. फक्त अल्लाहू अकबर म्हणा” असं एकाने म्हटलं, असं व्हीडिओत दिसतंय. त्यानंतर, हे तिघेही कारमधून उतरले. त्यावेळी कारबाहेरील तिघांनी यांच्यावर हल्ला केला.

विद्यारण्यपुरा पोलिसांनी IPC कलम २९५ ए (जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये, कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे; २९८ (धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने उच्चार, शब्द इ.); १४३; १४७ (दंगलीसाठी शिक्षा); ५०४ (शांततेचा भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान); ३२४ (धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी स्वेच्छेने दुखापत करणे); ३२६ (स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे); ५०६ (गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा) आणि १४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

बंगळुरूत नेमकं काय घडलं?

अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी दोघे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे सर्वजण एमएस पल्या येथील रहिवासी असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. फरमान आणि समीर दुचाकीवरून जात होते. त्यांनी चारचाकी गाडी थांबवली आणि त्यांना श्री रामाच्या घोषणा देण्यापासून अडवले. तसंच अल्लाहू अकबरचा नारा लावण्याचा आग्रह केला. शिवाय, कारमधील एकाने हातात झेंडा धरला होता. हा झेंडाही त्यांच्या हातून हिसकावण्यात आला. हिसकावलेल्या झेंडा पुन्हा घेण्यासाठी पीडितांनी हल्लेखोरांच्या मागे पाठलाग केला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.