“भारतात पैशांची कमतरता नाही. पण देशासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांची कमतरता आहे”, असे विधान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चंदीगड येथे बोलताना केले. रस्ते, महामार्ग आणि पायाभूत सुविधा यांचे निर्माण करण्यासाठी नितीन गडकरी झपाटून काम करतात, हे याआधी अनेकदा दिसले आहे. पायाभूत सुविधा उभारताना प्रशासनातील लाल फितीच्या कारभारावर त्यांनी अनेकदा बोट ठेवले आहे. प्रशासनासह ते पुढाऱ्यांवरही बोलायला कमी करत नाहीत. चंदीगडमध्ये बोलत असताना त्यांनी देशाला प्रामाणिक नेते हवे असल्याचे म्हटले.

नितीन गडकरी म्हणाले, “मी १९९५ साली युतीची सत्ता असताना मी मंत्रीपद भुषविले. आज तुम्ही मुंबईत गेल्यास तुम्हाला वरळी-वांद्रे सी लिंक दिसेल. तो तयार करण्याचे भाग्य मला मिळाले. मुंबईत ५५ पूल तयार केले. मुंबई-पुणे महामार्ग तयार करण्याची जबाबदारी मी पार पाडली. तेव्हा माझ्याकडे फक्त पाच कोटी होते. पैशांची कमतरता होती. त्यावेळी रिलायन्सचे ३६०० कोटींचे टेंडर मी रद्द केले. आज त्याची किमंत ४० हजार कोटींच्या घरात आहे. मी ते टेंडर रद्द केल्यानंतर खूप वाद झाला. सर्वात कमी किंमत त्यांनी दिली होती, अशी टीका माझ्यावर झाली. पण मला सांगायला आनंद होतो की, आम्ही कॅपिटल मार्केटमध्ये गेलो. एमएसआरडीसी सारखी संस्था निर्माण केली. आम्ही बाजारातून पैसे उभे केले. आम्ही ६५० कोटी जमवायला गेलो होतो, पण आम्हाला ११५० कोटी मिळाले. या एका प्रसंगाने मला शिकवले की, देशात पैशांची कमतरता नाही.”

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, आम्ही तीन-चार महिन्यापूर्वी एनएचएआय इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट ट्रस्ट कंपनीला बीएसइ वर सूचीबद्ध केले. केवळ सात तासांत आमचा बाँड प्रचंड विकला गेला. आमच्या सहकाऱ्यांकडून मला तातडीचे बोलावणे आले. मी गोव्याहून मुंबईत गेलो आणि बीएसई इमारतीमधील बेल वाजवून बाँड बंद केला. सात पटीने अधिक त्याची विक्री झाली होती. पैशांचा पाऊस पडला. मी ५० लाख कोटींचे काम केले आहे. तरीही आणखी २० ते २५ लाख कोटींचे काम मी करू शकलो असतो, पण ते झाले नाही, याची सल माझ्या मनात आहे.

नितीन गडकरी यांची संपत्ती किती?

नितीन गडकरी पुन्हा एकदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदार पार पाडले. उमेदवारी अर्ज भरत असताना गडकरी यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्या संपत्तीची माहिती दिली होती. त्यांनी २८ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. त्यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांत १० कोटींनी वाढली आहे.

गडकरींनी २०१९ मध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता १८ कोटी रुपये दाखवली होती. आता ती २८ कोटी ३ लाख १७ हजार ३२१ रुपये एवढी झाली आहे. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे १ कोटी ३२ लाख ९० हजार ६०५ रुपये, पत्नीकडे १ कोटी २४ लाख ८६ हजार ४४१ रुपये आणि कुटुंबाकडे ९५ लाख ४६ हजार २७५ रुपये अशी एकूण ३ कोटी ५३ लाख २३ हजार ३२१ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. एकूण स्थावर मालमत्ता २४ कोटी ४९ लाख ९४ हजार रुपयांची आहे. यापैकी स्वत: गडकरी यांच्या नावावर ४ कोटी ९५ लाख एवढी मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर ७ कोटी ९९ लाख ८३ हजार रुपयांची आणि कुटुंबाकडे ११ कोटी ५५ लाख ११ हजार रुपयांची मालमत्ता आहे.