पीटीआय, प्रयागराज : उत्तर प्रदेशातील बाहुबली-राजकारणी अतिक अहमद याला येथील खासदार-आमदार न्यायालयाने मंगळवारी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. २००६ सालातील उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिकसह अन्य दोघांना दोषी ठरविण्यात आले असून अहमदचा भाऊ खालिद अझिम ऊर्फ अश्रफ याच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. उत्तर प्रदेशातील फुलपूरचा माजी खासदार असलेल्या अतिक अहमदला सोमवारी गुजरातच्या साबरमती कारागृहातून प्रयागराज येथे आणण्यात आले. त्याच्यावर दाखल असलेल्या १०० खटल्यांपैकी पहिल्या खटल्याचा निकाल खासदार-आमदार न्यायालयाने दिला. अतिकसह त्याचा वकील सुलतान हनिफ आणि दिनेश पासी यांना जन्मठेपेसह १ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा देण्यात आल्याची माहिती सरकारी वकीलांनी दिली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व दोषींची नैनी कारागृहात रवानगी करण्यात आली. अतिकसह अन्य नऊ जणांविरोधात बसपचे तत्कालीन आमदार राजू पाल यांच्या हत्येचा आरोप होता. तेव्हा जिल्हा पंचायत सदस्य असलेले उमेश पाल या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी असल्याने त्यांचे अपहरण करण्यात आले होते.