सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंध गुन्हा ठरत नाही, असा निर्णय दिला असतानाच कानपूर पोलिसांकडे एक तक्रार आली आहे. कानपूर पोलिसांकडे पतीने तक्रार अर्ज दिला आहे. पत्नी लेस्बियन असून तिचे माझ्या चुलत बहिणीशीच संबंध आहेत, तिच्यासाठी पत्नी माझ्याकडे दुर्लक्ष करते, असा आरोप पतीने तक्रारीत केला आहे.

कानपूरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाचे पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. मात्र, लग्नाच्या काही दिवसांमध्येच त्याला पत्नी लेस्बियन असल्याचे समजले. पतीने तक्रारीत म्हटले आहे की, पत्नीचे माझ्या चुलत बहिणीशी लैंगिक संबंध आहेत. पत्नी बहिणीच्या संपर्कात आल्यापासून आमच्यातील लैंगिक संबंध संपुष्टात आले. पत्नी माझ्याकडे दुर्लक्ष करते, ती जास्त वेळ माझ्या चुलत बहिणीसोबतच असते, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे.

दोघींमधील संबंधांची माहिती कुटुंबियांना तसेच परिसरातील रहिवाशांनाही समजली. त्यांनी दोघींच्या कुटुंबियांवर बहिष्काराचा इशाराही दिला. मात्र, तरी देखील दोघींमधील संबंध कायम आहेत. शनिवारी पतीने व कुटुंबातील अन्य मंडळींनी दोघींना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. यानंतर दोघींनीही आम्हाला आत्महत्या करु, अशी धमकी दिल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे. तर तक्रार अर्ज देणाऱ्या तरुणाच्या आई – वडिलांनाही पोलिसांकडे व्यथा मांडली. ‘पत्नीचे बहिणीशीच संबंध असल्याचे माहित असूनही आमचा मुलगा तिच्यासोबत राहायला तयार झाला. मात्र, तिने मुलालाच धमकावले. आम्हाला सोडून दे, तू दुसरे लग्न कर, असे तिने मुलाला सांगितल्याचे आई – वडिलांनी पोलिसांना सांगितले.
कोतवाली पोलिसांनी तक्रार अर्ज घेतला असून या प्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलीस अधीक्षक प्रद्यम्न सिंह यांनी सांगितले. यासंदर्भात आम्ही कायदेतज्ज्ञांचे मत मागवले आहे, असेही त्यांनी नमूद केले.