देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्होडाफोनतर्फे कायमच आपल्या यूजर्सना विविध प्लॅन्स देऊन खूश केले जाते. त्याचबरोबर आता तरुणांना नोकरी देत व्होडाफोन आपल्या ग्राहकांना आणखी एक सुखद धक्का देणार आहे. नुकतीच कंपनीने जगातील सर्वात मोठ्या ‘आंतरराष्ट्रीय भविष्य नोकरी कार्यक्रमा’ची घोषणा केली आहे. या कार्यक्रमांतर्गत येत्या चार वर्षात म्हणजेच २०२२ पर्यंत देशात ५० लाख नोकऱ्या तयार होतील असे सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे १८ देशातील १ कोटी तरुणांना नव्या नोकऱ्या करण्यासाठी तयार करणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.

तरुणांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार असून डिजिटल अर्थव्यवस्थेत चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. तरुण पात्रतेनुसार तसेच आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपली ओळख तयार करु शकणार आहेत. याद्वारे ऑनलाइन डिजिटल कौशल्य प्रशिक्षण शोधणेही सोपे होणार आहे. व्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सूद याबाबत म्हणाले, भारतात सर्वाधिक तरुण आहेत. डिजिटल कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशाप्रकारचे उपक्रम आवश्यक आहेत. येत्या काळात व्होडाफोनव्दारे तरुणांना उत्तमोत्तम संधी देऊन आम्ही आमच्या परिने प्रयत्न करणार आहोत.