Earthquake in Turkey and Syria : तुर्कस्तानच्या इतिहासातल्या दुसऱ्या महाविनाशकारी भूकंपाने जग हादरलं आहे. काल (सोमवारी) पहाटे ४ च्या सुमारास तुर्कस्तान आणि सीरियासह आसपासचे देश भूकंपामुळे हादरले. या भूकंपाची तीव्रता ७.८ मॅग्निट्युड इतकी होती. या भूकंपात आतापर्यंत ४,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. याआधी १९३९ मध्ये इतक्याच तीव्रतेच्या भूकंपाने तुर्कस्तान हादरला होता. त्यावेळी तब्बल ३२,००० लोकांनी आपला जीव गमावला होता.

गेल्या २४ वर्षात तुर्कस्तानात भूकंपामुळे १८,००० हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. परंतु तुर्कस्तानात इतके भूकंप का येतात? यामागे काही कारण आहेत का? याबाबतची माहिती तुम्हाला या लेखाद्वारे मिळेल.

तुर्कस्तान आणि या देशाच्या आसपासचा प्रदेश हा अ‍ॅनाटोलियन प्लेटवर (Anatolian Plate) आहे. हा देश ६ टेक्टोनिक प्लेट्सने वेढलेले आहेत. अ‍ॅनाटोलियन प्लेटच्या पूर्वेला ईस्ट अ‍ॅनाटोलियन फॉल्ट आहे तर डाव्या बाजूला ट्रान्सफॉर्म फॉल्ट आहे. दक्षिण आणि दक्षिण-पश्चिमेला आफ्रिकन प्लेट आहे. याशिवाय तुर्कस्तानच्या उत्तरेला युरेशियन प्लेट आहे. या प्लेट घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरतात. त्यामुळे या प्लेट्समध्ये सतत घर्षण होतं. यामुळेच तुर्कस्तान आणि आसपासच्या प्रदेशात भूकंपाचे हादरे बसतात.

वैज्ञानिकांच्या मते हिमालयन क्षेत्रात जशी परिस्थिती आहे, त्यापेक्षा खूप वेगळी परिस्थिती इथे आहे. उत्तरेकडील अ‍ॅनाटोलियन प्लेटचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांना समजलं की, अ‍ॅनाटोलिया युरेशियन प्लेटपासून वेगळी झाली आहे. अभ्यासानंतर शास्त्रज्ञांनी सांगितलं की, या प्लेट्सवर अरेबियन प्लेट्सचा दबाव वाढू लागला आहे. तर युरेशियन प्लेट हा दबाव रोखत आहे.

हे ही वाचा >> तुर्कस्तान-सीरियात भूकंपामुळे भीषण विनाश, ६०० हून अधिक बळी, १० पॉईंट्समध्ये जाणून घ्या आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

१९७० नंतर ३ वेळा ६ मोठे भूकंप

यूएसजीएसने दिलेल्या माहितीनुसार अलिकडच्या काही वर्षांमध्ये तुर्कस्तान आणि आसपासच्या प्रदेशात ५ मॅग्निट्युडपेक्षा जास्त तीव्रतेचे अनेक भूकंप आले नाहीत. १९७० नंतर या प्रदेशात ६ मॅग्निट्युडपेक्षा जास्त तीव्रतेचे तीन भूकंप आले आहेत. या प्रदेशातला शेवटचा मोठा भूकंप जानेवारी २०२० मध्ये आला होता. सोमवारच्या भूकंपाची तीव्रता ७.८ मॅग्निट्युड इतकी होती. जमिनीखाली १७.९ किमी खाली हा भूकंप आला. त्यानंतर ७.५ मॅग्निट्युड इतक्या तीव्रतेचा आणखी एक भूकंप आला होता. भूकंप जमीनीच्या जितक्या जवळ होतो तितकी त्याची तीव्रता अधिक असते.

हे ही वाचा >> Turkey Syria Earthquake : टर्कीतील गोलबासी शहरात पुन्हा भूकंपाचे धक्के, २४ तासांतील चौथा भूकंप; आतापर्यंत ४ हजार नागरिकांचा मृत्यू

भूकंपाची भविष्यवाणी करता येते का?

नैसर्गिक आपत्तींपैकी भूकंपाची भविष्यवाणी आधी करता येत नाही. याची पूर्वमाहिती मिळवणं अवघड आहे. जमीनीखाली भूकंपाची उत्पत्ती होण्यास आणि त्याचा धक्का पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यास अवघे काही सेकंद लागतात. भूकंपाच्या तरंगांची गती ही प्रकाशाच्या वेगापेक्षा खूप कमी असते. या तरंगांचा वेग ५ ते १३ किमी प्रति सेकंद इतका असतो.