उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहेत तसतशा राजकीय नेत्यांकडून घोषणांना जोर आलाय. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये १ लाख २३ हजार स्मार्टफोन वाटप करणार असल्याची घोषणा लखनौमध्ये केलीय. हे स्मार्टफोन राज्यातील अंगणवाडी सेविकांना दिले जाणार आहेत. याशिवाय अंगणवाड्यांना इन्फेंटोमीटरही दिले जाणार आहे. या घोषणेचा २०२२ मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर किती परिणाम होणार हे आता पाहावं लागणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीआधी स्मार्टफोन वाटपाच्या घोषणेचा परिणाम पाहायला मिळेल, असा अंदाज काही राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जातोय. मात्र, प्रत्यक्षात काय परिणाम होईल हे निवडणूक निकालानंतरच पाहायला मिळेल.

योगी सरकारची स्मार्टफोन योजना नेमकी काय?

उत्तर प्रदेशमध्ये एकूण १ लाख ८९ हजार अंगणवाडी केंद्रं आहेत. यामध्ये जवळपास ४ लाख सक्रीय अंगणवाडी सेविका आहेत. त्यापैकी १ लाख २३ हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन दिला जाणार आहे. यामुळे त्यांना आपल्या कामात मदत होईल असं सांगितलं जातंय. यामुळे महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती सरकारकडे पोहचत राहिल आणि या विभागाचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल, अशी माहिती सरकारने दिलीय.

याआधी अखिलेश यादव यांच्याकडूनही लॅपटॉप वाटप

इलेक्ट्रॉनिक वस्तू वाटपाची ही उत्तर प्रदेशमधील ही पहिलीच घटना नाही. याआधी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री असताना विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वाटप केले आहे. समाजवादी पक्षाकडून आजही त्यांच्या काळातील कामाचं कौतुक करताना आपल्या या योजनेचा वारंवार उल्लेख होतो.

अखिलेश यादव यांची लॅपटॉप वाटप योजना काय होती?

2012 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी आपलं सरकार आल्यास 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्याची घोषणा केली. यानंतर सत्ता स्थापनेनंतर अखिलेश सरकारने पहिल्या हप्त्यात 10 हजार विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप केले. यासाठी अमेरिकन कंपनी एचपीला कंत्राट देण्यात आलं. ही योजना अखिलेश यादवांसाठी फायद्याची ठरल्याचीही चर्चा आहे.

वरुण गांधींचं शेतकऱ्यांसाठी योगी आदित्यनाथांना पत्र, दुसरीकडे ३६ शेतकऱ्यांवरच FIR