Pune Video : भारतात असलेल्या देवीच्या अनेक शक्तिपीठांपैकी महाराष्ट्रात देवीची एकूण साडे तीन शक्तिपीठं आहेत. यात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजा भवानी, माहूरची रेणुका माता; तर वणीची सप्तश्रृंगी या चार शक्तिपीठांचा समावेश आहे. लाखो भाविक या शक्तिपीठांना भेट देतात, शिवाय या स्वयंभू शक्तिपीठाच्या कथांचेदेखील पौराणिक ग्रंथात वर्णन केले आहे. दरम्यान, आज आम्ही अशाच एका स्वयंभू प्रकट झालेल्या पुण्यातील देवीचा इतिहास तुम्हाला सांगणार आहोत.

पुणे शहराच्या वायव्येला १७६५ साली म्हणजे जवळपास २५९ वर्षांपासून देवीचे वास्तव्य या ठिकाणी आहे. हे मंदिर सेनापती बापट रस्त्याने सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाकडे जाताना डाव्या बाजूला दिसते.

भक्तांसाठी प्रकट झाली चतुःश्रृंगी देवी

या मंदिराचे पुजारी नंदकुमार अनगळ यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पेशवे कालीन काळात एक दुर्लभ शेठ नावाचे सावकार होते, जे पेशव्यांच्या मोहिमांना कर्ज द्यायचे. शिवाय त्याकाळी ते नाणी बनवायचा व्यवसायदेखील करायचे. दुर्लभ शेठ हे वणीच्या सप्तश्रृंगीचे परमभक्त होते, त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आणि सेवेसाठी ते दररोज पुण्याहून सप्तश्रृंगी गडावर काही किमी प्रवास करायचे. परंतु, कालांतराने वाढत्या वयामुळे त्यांना हा लांबचा प्रवास करणं अशक्य होऊ लागलं. त्यावेळी देवीची सेवा करता येणार नाही, यामुळे ते खूप दुःखी झाले. दुर्लभ शेठ यांची देवीवरची निस्सीम भक्ती पाहून देवीला त्यांची दया आली, त्यानंतर साक्षात सप्तश्रृंगी देवीने दुर्लभ शेठ यांना त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितले की, “आता तू माझ्या दारी येऊ शकत नाही, मग मी तुझ्या दारी येते. पुण्यातील वायव्येच्या डोंगरावर तू उत्खनन कर, तिथे तुला माझी तांदळास्वरुप मूर्ती सापडेल आणि तीच मी आहे, त्याचीच तू इथून पुढे सेवा कर.” देवीने स्वप्नात दिलेल्या दृष्टांतानुसार दुर्लभ शेठ यांना पुण्यातील वायव्येच्या डोंगरावर एका लहान गुहेत देवीची ही तांदळास्वरुप मूर्ती सापडली. तांदळास्वरुप मूर्ती म्हणजे ज्यात केवळ देवीचा मुखवटा असतो.

पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सप्तश्रृंगी देवीची मूर्ती ज्याप्रमाणे एका बाजूला थोडी कललेली आहे, त्याचप्रमाणे चतुःश्रृंगी देवीची मूर्तीदेखील एका बाजूला थोडी कललेली आहे. शिवाय चैत्र पौर्णिमेला सप्तश्रृंगी गडावर देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. त्याचदिवशी इ.स १७६५ साली चैत्र पौर्णिमेला चतुःश्रृंगी देवीची ही स्वयंभू मूर्तीदेखील या ठिकाणी प्रकट झाली होती.

हेही वाचा: VIDEO : ‘पुण्याचे पंढरपूर’ माहितीये? पुण्यातील ‘या’ मंदिराला ‘पंढरपूर’ का म्हणतात?

देवीचे नाव चतुःश्रृंगी कसे पडले?

ज्याप्रमाणे वणीची सप्तश्रृंगी देवी सात डोंगरांच्या मध्ये वसलेली आहे, त्यामुळे तिचे नाव सप्तश्रृंगी पडले. सप्त म्हणजे सात आणि श्रृंगी म्हणजे डोंगराचे शिखर असा त्याचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे चतुःश्रृंगी देवीदेखील चार डोंगरांच्या मध्ये वसलेली आहे, त्यामुळे तिचे नाव चतुःश्रृंगी पडले.