होळी सण जवळ येताच मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांमध्ये सर्रास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, “यंदा शिमग्याक गावाक जाणार हास की?” या प्रश्नावरूनच समजेल की, शिमगा आणि कोकणवासियांचे किती जिव्हाळ्याचे नाते आहे. कोकणातील माणूस कामधंद्यासाठी किती लांब गेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणाला त्याचे पाय आपसूकच गावाकडे वळतात. वेगळी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येणाऱ्या या सणाची चाकरमानी वर्षभर वाट पाहत असतात. केवळ कोकणातच भारतभर होळीचा हा सण साजरा केला जातो. पण, महाराष्ट्रात आणि विशेषत: कोकणात या सणाला शिमगा असे म्हटले जाते. पण, हा उच्चार फक्त आता खेड्यापाड्यातच झालेला दिसतो. महाराष्ट्र आणि गोव्यात शिमगा किंवा शिमगो नावाने ओळखला जाणारा हा सण मुळात कुठून सुरू झाला? आणि शिमगा या शब्दाचा नेमका अर्थ काय? हे जाणून घेऊ….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकणातील शिमगोत्सव

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक गावात शिमगा साजरा करण्याच्या प्रथा, परंपरा वेगळ्या असल्या तरी कोकणावासियांमधील उत्साह मात्र अधिक दिसून येतो. रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही गावांमध्ये हा सण ५ ते १५ दिवसांपर्यंत चालतो. पण, शिमगा हा शब्द नेमका कुठून आला? तो कसा तयार झाला आणि त्याचा नेमका अर्थ काय? हे आपण ‘कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जाणून घेऊ….

शिमगा शब्द कुठून आला?

सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच होळीचा सण साजरा केला जातो. पण, गेल्या काही वर्षांमध्येही ही परंपरा कमी होत चालली आहे. तरीही अनेक घरापुढच्या छोट्या अंगणात होळीच्या दिवशी एका वेगळ्या उत्साहाचे वातावरण दिसून येते. कोकणात गणेशोत्सवाप्रमाणेच होळीलाही तितकेच महत्त्व आहे. चौकाचौकात साजऱ्या होणाऱ्या होळीभोवती बोंब ठोकत पोरं मनाला येईल त्या घोषणा द्यायचे पण, आता ते दिवस गेले. त्याकाळी मुलं एकदम मनसोक्त गायची आणि अचकट विचकट काहीही म्हणत बोंब मारायची, कारण तो सणच त्यासाठी होता. मुळचा हा गोमंतकीय सण, त्याचं नाव शिग्मा… शिमगा. शिमगा म्हणजे असीम गा, मुक्तपणानं गा. मनसोक्त गाण्याचा, नाचण्याचा हा सण म्हणजे शिमगा. जो कोकणात आजही तसाच साजरा केला जातो.

कोकणातील अनेक होळी आणि शिमग्यातील प्रथा शेकडो वर्षांपासून सुरू आहेत. हा एकप्रकारे लोकोत्सव आहे, पण वर्षांनुवर्षे त्याचे स्वरुप बदलतेय. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. या सणानिमित्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांत ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून गावच्या चावडीवर (सहाण) आणली जाते. होळीच्या दिवशी यावेळी ढोल-ताशांच्या गजरात पालखी चावडीवर आणली जाते. यानंतर होळीच्या संध्याकाळी पालखीतील देवीदेवतांची पूजा करून नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो. अनेक भागांत ही पद्धत वेगळ्या प्रकारेदेखील साजरी केली जाते. दुसऱ्या दिवशी पालखीसमोर होळी उभारली जाते. अनेक गावांत आंब्याचे, ताडाचे किंवा ठराविक एका झाडाचे मोठे लाकूड तोडून होळी उभारण्याची प्रथा आहे. याची होळी उभारल्यानंतर त्याची विधीवत पूजा केली जाते. गार्‍हाणे घालणे, नवस फेडणे आणि या वर्षी नवीन नवस करणे अशा प्रकारचे कार्यक्रम होतात. यानंतर अनेक पारंपरिक कार्यक्रम होतात, जे पाहण्यासारखे असतात.

यावेळी कोकणातील गावागावांत सत्यनारायणाची पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे-नमन अशा लोककला सादर केल्या जातात. यानंतर पालखी घरोघरी दर्शनासाठी फिरवली जाते. यादरम्यान नमन, गवळण, पारंपारिक खेळ अशा विविध लोककला सादर केल्या जातात. अशाप्रकारे कोकणात मोठ्या उत्साहात, जल्लोषात शिमग्याचा उत्सव साजरा केला जातो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shigmotsav 2024 dates shimga utsav in kokan maharashtra culture ratnagiri sindhudurga holi what is the meaning of marathi word shimga sjr