25 November 2017

News Flash

रग.. रेसिंगची..

नवे युग, नवी पिढी, नवे-नवे संशोधन व या अनुषंगाने तरुणांच्या उत्साहाला, बुद्धिमत्तेला, धाडसाला प्रोत्साहन

- रवींद्र बिवलकर ravindrabiwalkar@gmail.com | Updated: February 21, 2013 4:19 AM

नवे युग, नवी पिढी, नवे-नवे संशोधन व या अनुषंगाने तरुणांच्या उत्साहाला, बुद्धिमत्तेला, धाडसाला प्रोत्साहन देणारी ऑल टेरिन व्हेइकल्सची शर्यत म्हणजे देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना एक पर्वणीच. सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्स (एसएई) इंडिया या संस्थेद्वारे घेण्यात येणारी ही शर्यत म्हणजे ऑल टेरिन व्हेइकल्स अर्थात ऑफ रोड प्रकारच्या वाहनांच्या निर्मितीपासून वाहन शर्यतीमध्ये प्रत्यक्ष धावेपर्यंत असणारे आव्हान असते. भारतातील प्रसिद्ध वाहननिर्मात्या महिन्द्र आणि महिन्द्र कंपनीच्या प्रमुख सहभागाने घेण्यात येणारी ही ‘बहा एसएई इंडिया’ २००७ पासून भारतात घेण्यात येत आहे. भारतातील अनेक भागांमधील अभियांत्रिकी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धिकौशल्याबरोबरच धाडस, चिकाटी, जिद्द, तारुण्याचा जोमदारपणा, शारीरिक परिश्रम अशा विविध पैलूंना पणाला लावून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याची संधीच या शर्यतीमधून मिळते. १४ ते १७ फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशातील पिथमपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या बावनकशी सोने कोण ठरते याची उत्कंठा या स्पर्धेमध्ये सर्वानाच होती. त्यामध्ये पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनीअिरग पुणे (सीओईपी) या चमूने सवरेत्कृष्ट कामगिरी केली. १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या एडय़ुरन्स शर्यतीत त्यांनी पहिला क्रमांक मिळविला. त्यांनी तयार केलेल्या १८ क्रमांकाच्या वाहनाला या स्पर्धेअंतर्गत असलेल्या चाचण्यांच्या विविध टप्प्यांमध्येही प्रथम क्रमांक मिळाला. यामध्ये वाहनबांधणीचा दर्जा, सीएई डिझाइन, वाहनाला गतिमानता किती चांगली देण्यात आली आहे याची चाचणी त्याचप्रमाणे शर्यतीमध्ये ‘रफ्तार’ या नावाखाली असलेली चाचणी यातही पहिला पुरस्कार मिळाला. त्यानंतर अखेरच्या दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या एडय़ुरन्स चाचणीमध्ये सुमारे तीन-साडेतीन तास शर्यतीच्या मार्गावरील वळणे, चढ-उतार असे विविध टप्पे सातत्याने, सुलभपणे व कणखरतेने पार करून आपले वर्चस्व सिद्ध केले.
‘सीओईपी’च्या या चमूने तयार केलेल्या या वाहनाचा ड्रायव्हर होता गौरव मेहता. तर चमूचा कप्तान होता श्रीरंग पुराणिक. प्रा. दिलीप एन. मालखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली या चमूने सारी तयारी केली होती. या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर गाझियाबाद येथील कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअिरगच्या चमूने अभिषेक गुप्ता याच्या नेतृत्वाखाली बाजी मारली तर चंदिगढ येथील पीईसी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या चमूने कप्तान अमनदीप सिंग याच्या नेतृत्वाखाली तिसरा क्रमांक पटकाविला.

मध्य प्रदेशातील पीथमपूर. महिन्द्र आणि महिन्द्राच्या प्रकल्पानजीकचे एक मोकळे माळरानच. जिथे तयार केला होता ऑल टेरिन व्हेईकल्सच्या रेससाठीचा सुमारे साडेतीन-चार किलोमीटर लांबीचा रेसिंग ट्रॅक. शर्यत म्हणजे एक प्रकारची रणधुमाळीच. देशातील तब्बल २६२ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थी चमूंच्या निवडीनंतर या रेसच्या रणांगणावर विविध चाचण्यांचे टप्पे पार करण्याचे आव्हान. सुरुवातीला १६ फेब्रुवारीला झालेल्या चाचणीमधून २६२ पैकी १२० ऑल टेरिन व्हेईकल्स शिल्लक राहिली व १७ फेब्रुवारीला अंतिम शर्यतीमध्ये ९१ ऑल टेरिन व्हेईकल्स सहभागी होऊ शकली. अंतिम रेसची तब्बल तीन-साडेतीन तास वाहन चालविण्याची रग या नव्या ताज्या दमाच्या पिढीने जिद्दीने पेलली. काहींची वाहने काही टप्प्यांमध्ये बंद पडत होती, ती चालू करण्याचे आव्हान त्या संलग्न चमूतील सहकाऱ्यांचे होते. प्रत्येक सेकंद, मिनिट हे तेव्हा मोठे मोलाचे होते. वेळ दडवून चालणार नव्हता. त्यात परीक्षकांची मोटार येताच त्यांना ‘सर थोडा टाइम दिजिए, जादा प्रॉब्लेम नहीं है’, अशी विनवणी करीत आपल्या वाहनाला ठीकठाक करून रेसमध्ये पुन्हा उतरविण्याचे कौशल्यही या विद्यार्थ्यांनी पेलले. काही वाहने बिचारी चढणावर चढताना थकत असल्याचे दिसताच आयोजकांच्या स्वयंसेवकांकडून धक्का मारून पुढे वा बाजूला केली जात होती. त्यामुळे मागे असलेल्या वाहनाला मार्ग मोकळा करून दिला जात होता. स्पर्धकाचे वाहन रेस ट्रॅकवरून गतिमान करण्यासाठी त्या त्या स्पर्धकाच्या महाविद्यालयांमधील मित्रांकडून, मैत्रिणींकडून, घरातील आप्तांकडून प्रोत्साहन मिळत होते, त्यासाठी रेस ट्रॅकच्या कडेला विविध स्पर्धकांचे समर्थक चिअर अप करीत, जल्लोष करीत, हात उंचावून स्वागत करून आपल्या महाविद्यालयाच्या चमूचे, ड्रायव्हरचे मनोधैर्य उंचावीत होते. हीच रग होती स्पर्धकांची, त्याच्या चमूची व पाठीराख्यांची. समर्थकांचे प्रोत्साहनही रेसमधील शर्यतीप्रमाणेच होते. पळा पळा कोण पुढे पळे तो, ही उत्कंठा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भर उन्हात कायम होती. सकाळी साधारण १० वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली अंतिम शर्यत दुपारी ३ वाजेपर्यंत चालली होती. तोपर्यंत ना स्पर्धक थकले ना त्यांचे समर्थक ना प्रेक्षक.

अपयशावर मात करण्याची जिद्द!
ऑल टेरिन व्हेइकल्सच्या रेसमधील तब्बल तीन तासांच्या वाटचालीत कोणाचे वळणावर वा चढावावर चाक निखळत होते, तर ताकद कमी पडल्याने त्यांना धक्के मारावे लागत होते. कोणाला ट्रॅकबाहेर नेण्यासाठी टोइंगने मदत करावी लागल्यानंतर परीक्षकांची मनधरणी करून सर फार काही नाही, थोडा वेळ द्या स्पर्धेतून बाहेर काढू नका, काही मिनिटेच काम आहे, असे सांगून एखाद्या स्पर्धक गटाकडून त्रुटी दूर करण्याची झटापट केली जात होती. या साऱ्या प्रकारामध्ये ड्रायव्हरला वाहनाबाहेर न उतरता त्याला सारे सहकार्य त्याच्या चमूतील तंत्रकुशल सहकाऱ्यांनीच करावयाचे असते, ते सारे नियम पाळून प्रत्येक चमूमधील विद्यार्थी जिद्दीने, धडाडीने काम करीत होता. मग वाहनाला ताकद कमी पडली तर धक्का मारणे असो, की काही वेळासाठी रेस ट्रॅकबाहेर नेणे व ते वाहन तंदुरूस्त करणे असो. यातून जाणवत होते ते टीमवर्क, जिद्द आणि आपल्या कामावरची, महाविद्यालयावरची निष्ठा.

बहा एसएई२०१३.. एक प्रकारची परीक्षाच
एसएई इंटरनॅशनल या संस्थेतर्फे प्रथम अमेरिकेत छोटय़ा स्तरावर अशा प्रकारची स्पर्धा घेतली गेली. आज अनेक देशांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या बुद्धिला, संशोधनाला, शोधांना, अभ्यासाला चालना मिळावी, या हेतूने ही एक वेगळी स्पर्धा एसएईच्या वतीने घेण्यात येते. वाहन उद्योगाच्या दृष्टीने त्यामुळेच एक वेगळेच महत्त्व या स्पर्धेला दिले जाते. वाहन निर्मितीमध्ये त्याचे आरेखन कसे केले जाते, त्याचे मूल्य किती असते, वाहनाची सक्षमता किती असते, चढावाचा भाग, उताराचा भाग, अधिक काळ वाहन धावण्याची क्षमता आदी बाबी तपासल्या जातात. त्याचप्रमाणे  परीक्षकांपुढे विद्यार्थी या स्पर्धेत एक प्रकल्प म्हणून सादरीकरण कसे करतात याचाही विचार मूल्यांकनासाठी केला जातो.

First Published on February 21, 2013 4:19 am

Web Title: raceing fiver