21 September 2018

News Flash

नाटय़वेडा वारकरी

शब्दांत सांगता येणार नाही असे खूप छान काहीतरी त्या वयात ऐकायला शिकायला मिळाले.

‘‘जाहिरातीत एरवी इतर कलाकारांमध्ये असलेले छोटय़ा टाइपातील माझे नाव पुसले जाऊन मोठय़ा कलाकारांप्रमाणेच बोल्ड टाइपात ‘आणि.. कामण्णाच्या भूमिकेत जयंत सावरकर’ असे झळकले.. खरं सांगतो मळभलेल्या मनावर पडलेल्या या छोटय़ाशा प्रकाशकिरणांनी धडपडायला ऊर्जा मिळाली. त्यातूनच एकेकाळचा बॅकस्टेज आर्टिस्ट किंवा आयत्यावेळचा कलाकारपासून ते आजचा प्रस्थापित आणि आता ज्येष्ठ कलाकार बनलेला जयंत सावरकर तयार झाला. रंगभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या विष्णुदास भावे, केशवराव दाते यांच्या नावाचे पुरस्कार मला मिळणे म्हणजे माझ्यासारख्या नाटय़वेडय़ा वारकऱ्याला मिळालेला वारीचा प्रसाद समजतो..’’
अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या ९७ व्या संमेलनाध्यक्षपदी निवड झालेले जयंत सावरकर सांगताहेत त्यांच्या नाटय़सृष्टीविषयी..

HOT DEALS
  • Coolpad Cool C1 C103 64 GB (Gold)
    ₹ 11290 MRP ₹ 15999 -29%
    ₹1129 Cashback
  • Nokia 1 | Blue | 8GB
    ₹ 5199 MRP ₹ 5818 -11%
    ₹624 Cashback

‘‘हे पाहा, नोकरी सोडणे हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे, पण यापुढे फक्त अभिनेता म्हणून रंगभूमीवर वावरायचे असेल तर नाटय़व्यवसायावर तुमची अविचल निष्ठा असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु गरिबीला कंटाळून हार मानून रंगभूमीकडे पाठ फिरवलीत तर आपला संबंध संपला.’’ असा इशारेवजा सल्ला मला मिळाला होता माझ्या श्वशुरांकडून, साक्षात नटवर्य मामा पेंडसे यांच्याकडून. दुसरीकडे मध्यमवर्गीय मानसिकता असलेल्या माझ्या घरच्यांकडूनही माझ्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाला पाठिंबा नव्हताच आणि त्यात गैर काहीच नव्हते. लग्नापूर्वीपासूनच माझ्या नाटय़वेडाला आवर घालण्याचा त्यांच्या परीने ते प्रयत्न करत होते. मी रोज रात्रीची नाटके बघायला जाऊ नये म्हणून गॅलरीत माझे अंथरूण ठेवणे बंद करून पाहिले, पण नाटक पाहण्याच्या ध्यासाने मी हट्टाने नाटक पाहूनच घरी येई आणि गॅलरीत चक्क जमिनीवर झोपून जाई. अखेर त्यांनीच प्रयत्न थांबवले. खरे तर तेव्हाच्या शॉर्टहँडच्या परीक्षेत १८० च्या स्पीडमध्ये मी पहिला आलो होतो. रेडिओच्या बातम्यांचे त्याक्षणी डिक्टेशन घेण्यात माझा हातखंडा होता. थोडक्यात काय तर माझ्यासाठी नोकरी मिळणे त्याकाळी फारसे अवघड नव्हतेच. तेव्हा हातातल्या चांगल्या नोकरीची.. खात्रीची आमदनी सोडून बायको, मुलींची जबाबदारी असणाऱ्याने नाटकासारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात करिअर करायचा माझा विचार त्यांना अव्यवहार्य वाटल्यास नवल नव्हतेच. परंतु आचार्य अत्रेंच्या ‘सम्राट सिंह’ नाटकातील माझ्या विदूषकाच्या भूमिकेच्या प्रचंड कौतुकाने मी जणू हवेत तरंगत होतो. त्याच मन:स्थितीत फक्त पत्नीच्या पूर्ण पाठिंब्यावर नोकरी सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि त्याचबरोबर एकत्र कुटुंबातून बाहेर पडून स्वतंत्र राहण्याचाही.. हेतू हा की माझ्या निर्णयाची बरी-वाईट झळ संपूर्ण कुटुंबाला बसू नये.

गिरगावात राहात असल्याने लहानपणापासून ग्रँट मेडिकल कॉलेजच्या ग्राऊंडवर चालणाऱ्या नाटय़महोत्सवातली नाटके बघता बघता हळूहळू नाटकाविषयीचे आकर्षण वाढत गेले. नाटकासंबंधी कुठलाही मजकूर, बातम्या आसासून वाचायचा छंदच जडला. महाविद्यालयीन काळात आमचा शेजारी पुरुषोत्तम बाळ एकदा मला भारतीय विद्या भवन कला केंद्रात घेऊन गेला तिथे विजया जयवंत (मेहता), माधव वाटवे, अरविंद देशपांडे, दामू केंकरे, विजय तेंडुलकरांसारख्या प्रभृतींना प्रत्यक्ष पाहून हरखून गेलो आणि मग तिथला वारकरीच बनलो. नाटकाविषयीचा दृष्टिकोन, रंगभूमीचा अनेकांगानी केलेला विचार त्यांच्या चर्चातून माझ्या कानावर पडत असे. अत्यंत सुविद्य आणि कलाभिरुचीसंपन्न अशा त्या मंडळींच्या आसपास वावरताना मला कायम न्यूनगंड वाटत असे. अर्थात त्या चर्चामुळे माझ्या नाटय़विषयक जाणिवा संपन्न व्हायला नक्कीच मदत झाली. शब्दांत सांगता येणार नाही असे खूप छान काहीतरी त्या वयात ऐकायला शिकायला मिळाले. प्रत्यक्ष नाटकात काय चर्चातही मी सहभागी होत नव्हतो, पण त्यांच्या नाटकांची तिकिटे वगैरे खपवण्याची, बॅकस्टेजवरची कामांची.. जबाबदारी मी हौसेने पार पाडत असे.

कालांतराने तिथली नाटय़चळवळ बंद पडली, पण मी मात्र दामू केंकरेंचे बोट धरले ते कायमचेच. ते बसवत असलेल्या नाटकाच्या तालमींना हजर राहून त्यांनी नटांना दिलेल्या सूचना, नटांची संवादफेक, हालचाली याचे निरीक्षण करता करता पूर्ण नाटकाची संहिता मला पाठ होऊन जाई. त्याचीच परिणती आयत्या वेळी कुणा कलाकाराच्या गैरहजेरीत बदली कलाकार म्हणून माझी वर्णी लागू लागली. पाठांतरासंदर्भात ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र वर्देची कायम आठवण येते. प्रॉम्प्टरने पुस्तकातील वाक्ये विंगेतून भराभर न सांगता कलाकाराच्या हालचालीकडे त्याच्या पॉजकडे लक्ष देऊन आपली कुजबूज प्रेक्षकांपर्यंत न पोचता फक्त कलाकारापर्यंतच नेमकेपणाने पोचवण्याचे कसब त्यांच्याकडूनच शिकायला मिळाले.

स्टेजमागच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना केव्हातरी आपणही तोंडाला रंग फासून कलाकार म्हणून प्रत्यक्ष स्टेजवर वावरावे ही माझी इच्छा तशी गैर नव्हतीच, पण.. सर्वासमोर ती व्यक्त करण्यात माझा भिडस्त स्वभाव कायमच आडवा येई. सरिता पदकींचे ‘बाधा’ नाटक राज्य नाटय़ स्पर्धेसाठी बसवायची तयारी सुरू झाली तेव्हा त्यातील एक भूमिका मला नक्की जमेल असे मला तीव्रतेने वाटत होते पण तसे स्पष्ट सांगायचे धाडसच झाले नाही. तालमीपासून सादरीकरणापर्यंत माझा सहभाग राहिलाच पण त्याच्या पहिल्या प्रयोगाला आपल्याला काम मिळाले नाही म्हणून मेकअपरूममध्ये एकटाच रडत बसलो.. तेही कुणाच्या नकळतच, पण अशा निराशाजनक प्रसंगांनी माझे नाटय़वेड उणावले मात्र मुळीच नाही.

नाटकवेडा गिरगावकर असल्याने माझी पावले नियमितपणे साहित्य संघाकडे वळत. संघाच्या त्या दादा लोकांच्या गप्पांत सामील होण्याची काय त्यांच्यासमोर खुर्चीत बसायचीही माझी हिंमत नसे तरीही त्यांच्या आसपास घुटमळत त्यांच्या गप्पा ऐकत तिथली लहानसहान कामे करता करता त्यांच्या ‘सुंदर मी होणार’ किंवा ‘तुझे आहे तुजपाशी’च्या तालमी बघण्यापर्यंत मी अक्षरश: घुसखोरी केली आणि अर्थातच ..तिथला कार्यकर्ता बनलो. साहित्य संघ मंदिरातले प्रत्येक नाटक मी किमान ७-८ वेळा पाहिले कधी अधिकृतपणे तर कधी डोअरकीपरशी सलगी करून तंबाखूच्या चिमटीची देवाणघेवाण करत. अशा सततच्या धडपडीमुळे आयत्यावेळचा बदली कलाकार किंवा अन्य कलाकारांमध्येच माझी गणना असायची. माझ्या लग्नापूर्वीची गोष्ट. एकदा नाना जोगांनी मुक्तछंदात लिहिलेले ३ अंकी ‘हॅम्लेट’ नाटक दामू केंकरेंनी बसवले. त्यात नाटकातील नाटक असा प्रवेश होता. त्यात मला राणीची म्हणजे स्त्री भूमिका करायची संधी मिळाली. मी त्यालाही तयार झालो. नाटकाचे २५ प्रयोग झाले. दामूच्या प्रयोगशीलतेचे आणि सर्वच कलाकारांचे कौतुक झाले. एका प्रयोगानंतर मामा पेंडसेंनी आत येऊन दामूचे खूप कौतुक केले. आम्ही दुय्यम कलाकारही तिथेच त्यांच्या किमान कौतुकाच्या कटाक्षाच्या अपेक्षेत होतो. पण.. तसे काहीच झाले नाही. पुढे मामा माझे सासरे झाले आणि मी त्यांचा दशमग्रह  अर्थात जावई झालो. तेव्हा मात्र मी त्यांना तो मनातला ठुसठुसणारा सल बिनदिक्कतपणे सांगितला (जावयाच्या हक्काने जाब विचारला म्हणायला हरकत नाही.) त्यावर नेहमीच्याच गंभीरपणे ‘‘दिग्दर्शकाला पसंतीची पावती दिली की ती सर्वांपर्यंत पोचवायची जबाबदारी त्याची असते.’’ असे स्पष्टीकरण देत त्यांनी तो विषय तिथेच संपवला.

‘दुरितांचे तिमिर जावो’ नाटकात माझ्यासारख्या आयत्यावेळच्या कलाकाराने एकेकाळी साक्षात मामांनी रंगवलेली भूमिका केली, तो प्रसंग आजही माझ्या मर्मबंधातली ठेव बनून राहिलाय. झालं असं की.. ‘दुरितांचे तिमिर जावो’चा दुपारी साडेतीन वाजता नाटय़प्रयोग होता. त्यावेळी पंतांचे काम करणारे माधव आचवल काही अपरिहार्य कारणाने येऊ  शकणार नव्हते. शेवटच्या क्षणाला नाटक रद्द करण्यापेक्षा आयत्यावेळचा हुकमी कलाकार म्हणून दुपारी १च्या सुमारास भालचंद्र पेंढारकरांकडून मला विचारणा झाली. ते नाटक मी २२ वेळा पाहिले असल्याने पूर्ण संहिता मला तोंडपाठ होती. अगदी हालचाली आणि मुद्राभिनयासह. पण एकेकाळी मामांनी साकारलेली ती भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. मी ते आव्हान स्वीकारले.. कदाचित तोवर माझ्यातील न्यूनगंडाने माझ्याशी फारकत घेतली असावी. प्रयोग यशस्वी झाला. दुसऱ्या दिवशी ही बातमी साहित्य संघात पोचली आणि काय सांगू.. मी तिथे पोचल्यावर दाजी भाटवडेकरांनी त्यासाठी मला चक्क साष्टांग नमस्कार घातला.

‘सम्राट सिंह’मधील स्वतंत्र भूमिकेतील यशामुळे.. कदाचित अतिआत्मविश्वासाने सर्वाच्या सल्ल्याकडे, इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत नोकरी तर सोडली, पण दुर्दैवाने त्या नाटकाचे प्रयोग लवकरच थांबले. आणि मग.. सुरू झाली माझी अथक धडपड रंगभूमीवर स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी.. टिकवण्यासाठी आणि अर्थात उपजीविकेसाठीही.. सुधा करमरकरच्या ‘लिटल थिएटर’शी मी कायमच निगडित होतो. नवरसांपैकी कुठल्याही रसाचा आविष्कार आपल्या अभिनयातून नेमकेपणाने कसा सादर करावा किंवा शब्दातील अर्थ काढून तो प्रेक्षकांपर्यंत कसा पोचवावा कुठल्या शब्दावर कसा जोर आघात देऊन बोलावे याचे शिक्षण मला सुधाताईंकडूनच मिळाले. माझ्या सहज अभिनयात सुधाताईंचा मोलाचा वाटा आहे. ‘लिटल थिएटर’च्या एकूणएक नाटकांत मी काम करत होतो, पण इतरत्र मात्र कुठेतरी मिळतील ती फुटकळ कामे करण्यावाचून पर्याय नव्हताच.

अहमदाबादला ‘भावबंधन’च्या प्रयोगात कामण्णाचे काम करणाऱ्या शंकर घाणेकरांचे येणे रद्द झाल्यावर मला त्या भूमिकेसाठी बढती मिळाली. त्याबरोबर जाहिरातीत एरवी इतर कलाकारांमध्ये असलेले छोटय़ा टाइपातील माझे नाव पुसले जाऊन मोठय़ा कलाकारांप्रमाणेच बोल्ड टाइपात ‘आणि कामण्णाच्या भूमिकेत.. जयंत सावरकर’ असे झळकले. खरे सांगतो, मळभलेल्या मनावर पडलेल्या अशा छोटय़ाशा प्रकाशकिरणांनीसुद्धा त्यावेळी धडपडायला ऊर्जा मिळे. ठेकेदारांच्या मागणीनुसार मी पदरची वाक्ये टाकून प्रेक्षकांचे हशे मिळवीत असे. परंतु ज्येष्ठ अभिनेते परशुराम सामंत मात्र तसे न करण्यासाठी मला वेळोवेळी सावध करायचे. नाटकातील.. ‘बन्सी बजाए गिरीधारी..’ हे गीत मी माझ्या आधीच्या कलाकारांप्रमाणेच पशू-पक्ष्यांचे वगैरे आवाज काढून गात असे तेव्हा एकदा चिडून त्यांनी मला कामण्णाची भूमिका अजरामर करणाऱ्या दिनकर डेरेंची शैली समजावून सांगितली. त्यानुसार मी मग पं.गोविंदराव अग्नींकडून ते गीत बसवून घेतले त्यानुसार एक सुंदरशी तान घेऊन माझे गाणे जेव्हा संपवले तेव्हा सामंत खूश झालेच पण सांगायला अभिमान वाटतो की गडकरी जन्म शताब्दी वर्षांत ‘भावबंधन’च्या १२५ प्रयोगांत माझ्या त्या गाण्याला कायमच प्रेक्षकांच्या टाळ्या मिळाल्या. पं.राम मराठेंबरोबर काम करतानाही मी कधी वाह्यतपणा केला तर ते चक्क ‘तुझ्या कानफटात मारीन’ असा प्रेमळ दमही द्यायला कचरत नसत. नाटय़सृष्टीतील दिग्गज म्हणावेत असे दारव्हेकर मास्तर, राजा गोसावी आणि ज्यांना कायम गुरुस्थानी मानले ते दामू केंकरे सगळ्यांकडूनच प्रेक्षकशरण न होता सहज संयमित अभिनय करणे, काम चांगले करणे आणि काम समजून भूमिकेत शिरून करणे यातील सूक्ष्म अंतर.. हे सारे सारे मला शिकायला मिळाले, पण .. असा संयत अभिनय करायला मिळेल अशी एकही आव्हानात्मक भूमिका हाती येत नव्हती. यशाचा राजमार्ग नजरेस पडत नव्हता. पायाखालची वाट चढ-उतारांची नव्हे तर खाचखळग्यांचीच वाटत होती. प्रकाशवाटेचा शोध थांबवून नोकरीची मळलेली वाट पकडण्याचे निराश विचार मनात घोंघावत असतानाच त्या संभ्रमित अवस्थेत रणजित बुधकरने मला ३ महिने धीर धरण्याचा सल्ला दिला. इथे मला तर १-१ दिवस भारी होता.

नक्की कशामुळे कल्पना नाही पण खरोखर चमत्कार घडला. जयवंत दळवींच्या ‘सूर्यास्त’ नाटकातील गायकवाडच्या भूमिकेसाठी मला विचारण्यात आले आणि मनाला उत्साहाची पालवी फुटली. जीव ओतून मी ती भूमिका साकारली. प्रयोगानंतर अप्पाजींची भूमिका साकारणाऱ्या निळू फुलेंनी तर सुखद धक्काच दिला. ‘‘सावरकरांना गायकवाडचे काम मुळीच जमणार नाही तेव्हा तुम्ही त्यांच्याऐवजी दुसरा नट शोधा, असा लेखी सल्ला मी सारंगना दिला होता पण तो अत्यंत चुकीचा होता हे तुम्ही आज सिद्ध केले.’’ असे त्या महान कलाकाराने सर्वासमोर प्रांजळपणे कबूल केले तेव्हा.. निळू फुले फक्त कलाकार म्हणून मोठे नाहीत तर माणूस म्हणूनही किती मोठे होते त्याचा तेव्हा प्रत्यय आला. तसेच आजवर बालरंगभूमीवर आणि इतरत्र छोटय़ा-मोठय़ा भूमिका करणाऱ्या सावरकरांनी गायकवाडची भूमिका यशस्वीपणे पेलली असे कौतुक ज्येष्ठ समीक्षक माधव मनोहरांनी केले तेव्हा अंगावर मूूठभर मास चढले. १९५५ पासून तोपर्यंत माझ्या नाटकप्रेमाला फारसा गांभीर्याने न घेणारा माझा मोठा भाऊ  १९७८ मध्ये म्हणजे २३ वर्षांनी प्रथमच माझे ‘सूर्यास्त’ नाटक पाहण्यास आला तोही अमृतक्षण होता.

पूर्वी पु. लं. जेव्हा आकाशवाणीवर मराठी विभागप्रमुख होते तेव्हा माझ्या ऑडिशन टेस्टला ‘खडाष्टक’मधील म्हाताऱ्याचे संवाद कसे म्हणायचे ते तंत्र त्यांनीच शिकवले होते. एके दिवशी ‘सूर्यास्त’च्या प्रयोगानंतर नाटकाचे कौतुक करायला पु.लं. आत आले. आवर्जून मला हाक मारून त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली, तो माझ्या दृष्टीने कौतुकाचा कळसाध्याय ठरला. अशा रीतीने ‘सूर्यास्त’ नाटकामुळे माझ्या अभिनय कारकिर्दीची पहाट उगवली. परंतु पहाटेला उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळतोच तसेच कालांतराने ‘सूर्यास्त’ नाटकाचाही रंगभूमीवरून अस्त होत गेला. मात्र त्याच सुमारास घराघरांत पोचलेल्या ‘दूरदर्शन’वरच्या ‘गजरा’, किंवा अनेक कार्यक्रमांमध्ये विनय आपटेबरोबर कामे करत गेलो. आकाशवाणीशी तर कित्येक वर्षांचा ऋणानुबंध असल्याने लोकप्रिय अशा ‘प्रपंच’ कार्यक्रमातही बदली कलाकार म्हणून प्रभाकर जोशींच्या टेकाडे भावोजींची भूमिका निभावत होतो. आजही आकाशवाणीवर माझी हजेरी असतेच. रंगभूमीच्या बाहेर मराठी आणि हिंदीच्या रूपेरी पडद्यावरही स्वतंत्र भूमिकांत वावरू लागलो होतो, पण खरे प्रेम नाटकावरच होते. त्याच दरम्यान पु.लं.च्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटकातील हरीतात्या आणि रत्नांग्रीचा अंतू बर्वा अशा दोन भूमिका मला साकारायला मिळाल्या. मी मूळचा रत्नागिरीकरच असल्याने तो सूर मला नेमका गवसलाय, अशी दाद साक्षात पु.लं.कडून मिळाली. त्या भूमिकांमुळे अमेरिकावारीसुद्धा घडली.

रंगभूमीच्या एका मोठय़ा कालखंडाचा सुमारे ६० वर्षांचा मी साक्षीदार. किर्लोस्कर देवलांपासूनच्या अनेक नाटकांचे संवाद किस्से मला तोंडपाठ आहेत. पुस्तकरूपाने त्या सर्व आठवणींचा गोफ गुंफण्याची कल्पना दाजी भाटवडेकरांनी मला सुचवली आणि ती मूर्तरूपात आणण्यासाठी मंगेश कदमने आग्रह करताना पुस्तकाचे नावही सुचवले.. ‘मी एक छोटा माणूस’ ज्याचे अलीकडेच प्रकाशन झाले.

आता ज्येष्ठत्वाची झूल अंगावर चढलीय. अनेक मानसन्मान मिळत आहेत. गेल्या वर्षी अ.भा.मराठी नाटय़ परिषदेने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचे मानपत्र स्वीकारले पण थैली मात्र रंगभूमीवरील वृद्ध कलाकारांच्या साहाय्यासाठी त्यांच्याकडे सुपूर्द केली. माझ्यासारख्या रंगभूमीवरील एका साहाय्यक कलाकाराची अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या ९७ व्या संमेलनाध्यक्षपदी झालेली बिनविरोध निवड तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव म्हणावे अशा ‘चतुरंग’ प्रतिष्ठानने अत्यंत आपुलकीने साजरा केलेला माझा सहस्रचंद्रदर्शन सोहळा या साऱ्याने माझी ओंजळ समाधानाने भरून गेलीय अडचणींना न जुमानता आषाढीच्या वारीला पायी जाणाऱ्या पंढरीच्या वारकऱ्याची पांडुरंगावर जी श्रद्धा असते तीच अढळ श्रद्धा आजवर मी रंगभूमीवर ठेवत आलोय. एकेकाळचा बॅकस्टेज आर्टिस्ट किंवा आयत्यावेळचा कलाकारपासून ते आजचा प्रस्थापित आणि आता ज्येष्ठ कलाकार बनलेल्या जयंत सावरकरला रंगभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या विष्णुदास भावे, केशवराव दाते, मा.नरेश याच्या नावाचे पुरस्कार ज्याच्यावर यापूर्वी अनेक महान नटसम्राटांचे नाव कोरले गेलेय ते पुरस्कार मला मिळणे म्हणजे माझ्यासारख्या नाटय़वेडय़ा वारकऱ्याला मिळालेला वारीचा प्रसाद समजतो.. वयाची ८० पार केल्यावर.. रूढार्थाने वानप्रस्थाश्रमी झाल्यावरही या छोटय़ा माणसाला रंगमंचावर वावरण्याची नित्यनवी ऊर्जा मिळतेय ती रंगभूमीच्या सहवासातच या मराठी नाटय़सृष्टीकडून!

जयंत सावरकर

शब्दांकन – अलकनंदा पाध्ये

अलकनंदा पाध्ये- alaknanda263@yahoo.com

First Published on December 17, 2016 1:23 am

Web Title: marathi drama artist jayant savarkar