News Flash

BLOG : अनाकलनीय ‘राज’कीय घटनांची श्रृंखला

विधानसभा निवडणुकांमध्येही अनाकलनीय घडेल ही आशा मनसैनिकांच्या मनात रूंजी घालत असणार...

– योगेश मेहेंदळे

२००९ ते २०१२ या कालावधीत मनसेनं शिवसेनेसह अन्य मातब्बर पक्षांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. ते कसं काय जमलं हे शिवसेना भाजपासह, काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठीही अनाकलनीय होतं. त्यानंतर अवघ्या पाच-सात वर्षांत मनसे २००९च्या आधी जिथं होती तिथंच परत जाऊन पोचली, असं का घडलं हे ही तमाम मनसेप्रेमींसाठी अनाकलनीय होतं. नरेंद्र मोदी भारताला पडलेलं दैदीप्यमान स्वप्न का हे जसं अनाकलनीय होतं, तसंच अचानक ते अस्तनीतला निखारा का झाले बुवा? हे ही अनाकलनीयच होतं. तर अनाकलनीयतेचं नी मनसेचं नातं फार जुनं आहे, जन्मापासूनच म्हणा ना! खरं तर, अनाकलनीयता ही अगदी विश्वाच्या निर्मितीपासूनच मानवासाठी संशोधनाला, विचारांचे परीघ रूंदावायला उद्युक्त करणारी प्रेरणा आहे. त्यामुळं काही अनाकलनीय असणं हे वाईटाचं लक्षण नसून जास्त खोलात जायला, अभ्यास करायला भाग पाडणारं संप्रेरक आहे असं म्हणायला हरकत नाही.

२००९ मध्ये १३ आमदार निवडून आलेल्या मनसेचा २०१९ पर्यंत उरलेला एकमेव आमदारही आता शिवसेनेत गेला. विशेष म्हणजे शिवसेनेच्या माजघरात मुंबईत मनसेनं सहा जागा जिंकल्या तर शिवसेनेला अवघ्या चार जागांवर समाधान मानावं लागलं ही म्हटलं तर सगळ्यात जास्त अनाकलनीय घटना. मुंबईमधला मनसेचा मतांचा टक्का होता २४ टक्के तर शिवसेनेला मिळालेली मतं होती १८ टक्के. शिवसैनिक असोत वा मनसैनिक सगळ्यांचं दैवत बाळासाहेब आहेत यात काहीही शंका नसताना, मुंबईतल्या मराठी मतदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला मत न देता मनसेच्या पारड्यात मत दिलं हे ही अनाकलनीयच होतं आणि त्याच मुंबईत आज मनसेचा एकही आमदार असू नये याला तर अनाकलनीयतेचा कळस म्हणायला हरकत नसावी. या व्यतिरिक्त मुंबई इलाख्यातल्या ३६ पैकी तब्बल ११ जागांवर केवळ मनसेमुळे शिवसेना-भाजपाला पराभवाची धूळ चाखावी लागली होती, हे ही त्यावेळी अनेकांना अनाकलनीयच वाटलं होतं.

२०१२ मध्ये ४० नगरसेवकांसह नाशिक महापालिकेवर अनाकलनीय झेंडा फडकावणाऱ्या मनसेला २०१७ मध्ये हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या अवघ्या पाच जागा मिळाल्या याचं आकलन कसं व्हावं. आता इतक्या कमी का मिळाल्या हे अनाकलनीय? की इतक्या तरी का मिळाल्या हे अनाकलनीय? ज्याचं त्यांनी ठरवावं, पण अनाकलनीयतेचा गूढ स्पर्श या घटनेमागे आहे हे खरं.

ज्या गुजरात मॉडेलचे तोंड फाटेस्तोवर कवतुक केलं ते मॉडेल सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्याला फसवून गळी उतरवलं, नी जग फिरलेले आपण त्याला बळी पडलात हे देखील अनाकलनीय. आणि भाजपाच्या रावसाहेब दानव्यांच्या जावयामुळं शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पडावेत नी एमआयएमच्या जलील यांचा विजय व्हावा हे माहिती असलेल्या भाजपाच्या फडणवीसांनी “रताळ्याला म्हणतंय केळं, दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खुळं” या व्यक्त केलेल्या भावनाही अनाकलनीय.

आपलं दैवत असलेल्या बाळासाहेबांनी जाणत्या राजाशी जाहीर मैत्री ठेवली, परंतु राजकीय लक्ष्मणरेखा न ओलांडण्याची चतुराई कायम राखली, ती सीमारेषा आपण नुसती ओलांडलीच नाही तर पुसून टाकली हे ही अनाकलनीयच.

प्रकाश राज सारख्यांनी लोकसभा निवडणुकांचे निकाल ही आपल्याला चपराक आहे हे खुलेपणानं कबूल केलं आणि लढा सुरूच राहणार हे ही सांगितलं. राहूल गांधींसह शरद पवारांपर्यंत सगळ्या विरोधकांनी पराभव स्वीकारून आत्मपरीक्षणावर भर दिला. सगळ्यांनी जनताजनादर्नाच्या मनात काय आहे हे ओळखण्यात आपण कमी पडल्याचं मान्य केलं, मात्र फक्त आपण अनाकलनीय म्हणावं हे ही अनाकलनीय…

विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. सध्याचा एकंदर कल बघता महाराष्ट्रातील राजकीय परीघ चार पक्षांमध्ये संपतो. परंतु वरील अनाकलनीयतेची राजकीय शृंखला बघता, काहीतरी अनाकलनीय घडेल अशी सुप्त आशा प्रत्येक मनसैनिकाच्या मनात रूंजी घालत असेल यात काही शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 1:41 pm

Web Title: blog raj thackeray mns bjp mystery loksabha election 2019 narendra modi
Next Stories
1 नोकरी शोधता शोधता मिळाली उमेदवारी, निवडणूक जिंकत ठरली सर्वात तरुण खासदार
2 Loksabha 2019 : मतदारांच्या केमिस्ट्रीची राजकीय गणितावर मात!-मोदी
3 पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा कार्यकर्त्याची हत्या
Just Now!
X