अमेरिकेच्या अध्यक्षाला जेवढी मतं मिळाली तेवढी तर आपल्या मतांमध्ये २०१९ मध्ये वाढ झाली असं सांगत नरेंद्र मोदींनी भारताच्या विशालतेचं वर्णन केलं. मोदींची रालोआच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर रालोआच्या खासदारांशी त्यांनी संवाद साधला. जनता जनार्दन ईश्वराचं रूप असतं असं सांगत ज्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला व ज्यांचा विश्वास मिळवायचाय अशा दोघांसाठी काम करणार असल्याचं मोदी म्हणाले.

यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं असून नारीशक्तीचे आभार मानले. भारताच्या इतिहासात प्रथमच इतक्या महिला खासदार असल्याचं ते म्हणाले. नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये केलेले सगळे रेकॉर्ड नरेंद्र मोदींनीच २०१९ मध्ये तोडले असं त्यांनी सांगितलं.

गठबंधनचं राजकारण महत्त्वाचं असल्याचं सांगताना ही वाजपेयींची देणगी असल्याचं ते म्हणाले. सभागृहातील वाजपेयींचे छायाचित्र आपल्याला आशीर्वाद देत असल्याचं त्यांनी सांगितले. एनडीएचा प्रयोग आणखी यशस्वी करायचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

स्थानिक उन्नत्ती व राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा या दोन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे ते म्हणाले. National Ambitions Regional Aspirations हा आपला NARA नारा असल्याची कोटी मोदींनी केली. एनर्जी व सिनर्जी या एनडीएच्या हातातील महत्त्वाच्या दोन गोष्टी असल्याचं ते म्हणाले.

प्रसिद्धीच्या मोहापासून सावध रहाण्याचा सल्ला मोदींनी पहिल्यांदा खासदारांना दिला आहे. वृत्तपत्रात फोटो टिव्हीवर मुलाखतीची हौस मोठं संकट निर्माण करू शकते असं ते म्हणाले. ऑफ द रेकॉर्ड काही नसतं असं सांगताना कुठल्या प्रतिक्रियेचा परिणाम काय होईल हे सांगताही येत नाही त्यामुळे प्रसिद्धीच्या मोहापासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.