रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज जालना येथे सभा घेतली होती. या सभेमध्ये अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे माझी मेहबूबा असल्याचे वक्तव्य करत दोघांतील वितुष्ट संपल्याची जाहीर कबूली दिली. लोकसभा निवडणूकीपूर्वी खोतखर-दानवे यांच्यातील वितुष्ट अख्या महाराष्ट्राने पाहिले होते. खोतकरांनी दानवे विरोधात निवडणूक लढवण्यासाठी तयारी दर्शवली होती. मात्र, पक्ष श्रेष्ठींनी समजूत घातल्यानंतर दोघांचे मनोमिलन झाले होते.

जालना येथे प्रचारसभेत बोलताना खोतकर यांनी दानवे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी आणि रावसाहेब दानवे ३० वर्षांपासून जोडीदार आहोत. खरे तर रावसाहेब दानवे माझी मेहबूबा आहे. मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात. असे म्हणताच मंचावर उपस्थित असणाऱ्या दानवेंच्या चेहऱ्यावर हसू आले होते. दानवे यांच्यासह उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला होता.

पुढे बोलताना खोतकर म्हणाले की, ३० वर्षांपासून सोबत असलेली ही जोडगोळी राज्याच्या विधानसभेपासून लोकसभेपर्यंत काम करते. शिवसेनेच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो की, यावेळी आपल्याला नवा इतिहास घडवायचा आहे. दानवे यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करून लोकसभेत पाठवायचे आहे.

अमित शाह यांचा आम्हाला सर्वांना आशिर्वाद मिळाला आहे. यावेळी सर्वांच्या वतीने मी अमित शाह यांना सांगू इच्छितो की, आम्ही नवीन इतिहास घडवून दाखवू. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताने रावसाहेब दानवे यांना विजयी करून पाठवू. तर आणि तरच केंद्रामध्ये तूम्ही आम्हाला चांगली जागा द्या.

जालना मतदार संघामध्ये भाजपाकडून रावसाहेब दानवे पाचव्यांदा निवडणुक रिंगणात उतरले आहेत. दानवे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यातील वादामुळे जालना मतदार संघ राज्य पातळीवर चर्चेत आला होता. पण अर्जुन खोतकर यांच्या या पवित्र्यामुळे आता नाराज शिवसैनिक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.