लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशातील १० राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये ९३ जागांसाठी मतदान होत आहे. याबरोबरच महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत असून सकाळी सात वाजताच मतदानाला सुरुवात झाली. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे सर्वाधिक लक्ष लागले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता काटेवाडी येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“आज बारामतीमध्ये मतदान पार पडत आहे. आम्ही सहकुटुंब मतदान केले आहे. मी जनतेला सातत्याने सांगत आलो आहे की, ही निवडणूक गावकीची भावकीची नाही. मात्र, कुटुंबातील काही जणांनी तशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला. महायुतीमध्ये आम्ही सर्वांनीच प्रचार केलेला आहे. मात्र, प्रचारादरम्यान विरोधकांनी वेगवेगळ्या आरोपांचा धुराळा उडवला आहे. मी आधीपासून ठरवलं होतं की, विकासाला महत्व द्यायचं. त्यामुळे आरोपाला मी जास्त महत्व दिले नाही. बारामती मतदारसंघात केलेले काम आणि मतदारसंघाचा सर्वांगीन विकास व्हावा हाच आमचा प्रयत्न आहे”, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा : विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपा आक्रमक, निवडणूक आयोगाकडे केली तक्रार; म्हणाले, “अशा आरोपांमुळे…”

रोहित पवारांच्या टीकेवर अजित पवार काय म्हणाले?

रोहित पवार यांनी काही व्हिडीओ ट्विट करत बारामतीत पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला होता. रोहित पवारांच्या या आरोपावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत त्यांच्यावर हल्लाबोल केला. अजित पवार म्हणाले, “हे काम निवडणूक आयोगाचे काम आहे. आजपर्यंत मी सातवेळा विधानसभा आणि एक लोकसभा लढवली आहे. त्यामुळे असे प्रकार करत नाही. कारण नसताना विरोधकांचे काही बगलबच्चे अशा प्रकारचे आरोप करत होते. ते आमच्यावरही आरोप करत आहेत. आम्हीही त्यांच्यावर आरोप करू शकतो. त्यांनी चुकीच्या पद्धतीने निवडणुकीची हाताळणी केली. ते काहीही आऱोप करत आहेत. तुम्ही स्वत: ती बँक उघडी पाहिली का? जो समोरचा आरोप करतो, त्याच्यावर काहीतरी परिणाम झालेला आहे. त्यामुळे ते आरोप करत असावेत. माझ्या दृष्टीने त्या आरोपाला काहीही महत्व नाही. त्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरजही मला वाटत नाही”, असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी रोहित पवारांना दिले.

बारामतीच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष

बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या नणंद-भावजयमध्ये सामना होत आहे. मात्र, असे असले तरी खरी लढाई ही माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये आहे. त्यामुळे ही निवडणूक शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या बारामतीच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.