मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट पाहायला मिळाली. परिणामी दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाने बहुमताचा टप्पा गाठला होता. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट पाहायला मिळत नाहीये. राजकीय विश्लेषकांसह भाजपा नेत्यांनीही ही गोष्ट मान्य केली आहे. महाराष्ट्रात महायुतीसह महाविकास आघाडीने तगडं आव्हान निर्माण केलं आहे. परिणामी महायुतीच्या उमेदवारांसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन मतं मागावी लागत आहेत. मोदी यांनी महाराष्ट्रात मागील दोन्ही निवडणुकांपेक्षा अधिक प्रचार केला. त्यांनी यंदा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात आतापर्यंत १९ सभा घेतल्या. तसेच मुंबईत रोड शो देखील केला. ते अजूनही काही सभा घेणार आहेत. महायुतीत भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रामदास आठवलेंचा रिपाइं, रवी राणांचा युवा स्वाभिमान आणि महादेव जानकरांच्या रासपसह अनेक पक्ष आहेत. त्याचबरोबर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. असं असूनही मतांसाठी स्वतः पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रात इतकं का फिरावं लागतंय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची संयुक्त शिवसेना आमच्याबरोबर होती, तेव्हा देखील नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात १३ सभा घेतल्या होत्या. आता त्या सभा वाढल्या आहेत. त्यामागे दोन कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे, मागील लोकसभा निवडणूक चार टप्प्यात झाली होती आणि मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात केवळ तीन ते चार दिवसांचं अंतर होतं. त्यामुळे महाराष्ट्रात मोदींच्या सभा घेण्याला मर्यादा होत्या. यावेळी मात्र लोकसभेची निवडणूक सात टप्प्यांमध्ये होत आहे. तर महाराष्ट्रातील निवडणूक पाच टप्प्यांमध्ये होत आहे. तसेच या मतदानाच्या काही टप्प्यांमध्ये सात दिवसांचं अंतर आहे. त्यामुळे आम्हाला मोदींच्या अधिकाधिक सभा घेण्याची संधी होती. तसेच आम्ही मोदींना सभांसाठी तारखा मागितल्या आणि प्रत्येक टप्प्यात आम्हाला त्यांच्या तारखा मिळाल्या. मागच्या निवडणुकीत इतक्या सभा घेण्याची संधी नव्हती. आम्ही मागच्या वेळी देखील त्यांना तारखा मागितल्या होत्या. परंतु, आम्हाला तारखा मिळाल्या नव्हत्या. यावेळी तराखा मिळाल्या म्हणून आम्ही त्यांच्या इतक्या सभा घेतल्या.” फडणवीस टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी यंदा महाराष्ट्रात अधिक सभा घेण्याचं दुसरं कारण म्हणजे, आमच्याबरोबर जरी खरी राष्ट्रवादी, खरी शिवसेना असली, तरी या दोन्ही पक्षांचे दोन दोन गट तयार झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मतांचं विभाजन झालं आहे. या दोन्ही पक्षांची काही मतं उद्धव ठाकरेंकडे गेली आहेत, तर काही मतं शरद पवारांकडे गेली आहेत. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की त्यांचे (महाविकास आघाडीचे) जे मतदार संघ आहेत त्यावरही आपण लक्ष दिलं पाहिजे. उदाहरणार्थ, यापूर्वी आम्ही धाराशिव आणि लातूर या दोन्ही मतदारसंघांसाठी एकच सभा घ्यायचो. औसा येथे आम्ही संयुक्त सभा घ्यायचो. यावेळी मात्र आम्ही दोन्ही मतदारसंघांसाठी दोन वेगवेगळ्या सभा घेतल्या. लातूरसाठी आमची एक वेगळी सभा घेतली आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी आम्ही धाराशिवला दुसरी सभा घेतली. अशा रीतीने आमच्या तीन ते चार सभा वाढल्या.”

हे ही वाचा >> भाजपाला बहुमत मिळालं नाही तर ‘प्लान बी’ काय?, अमित शाहांनी स्पष्ट सांगितलं…

उपमुख्यमंत्री म्हणाले, “मुळात आमच्या नेत्याला ऐकायला लोक येतात म्हणून आम्ही आमच्या नेत्याला बोलावतो. आम्ही जर आमच्या नेत्याला बोलावत असू तर इतरांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? आमचे नेते येतात, त्यांच्या सभेला गर्दी होते. आम्हाला मोदींच्या यापेक्षा अधिक सभा हव्या होत्या. तसेच एका गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की नरेंद्र मोदींच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी होत आहे. अगदी गरीबातला गरीब घटक देखील त्यांच्या सभेला येतोय, ही नरेंद्र मोदींची कमाई आहे.”

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis answer why does pm modi hold many public meetings in maharashtra asc