हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या भाजपाच्या महिला उमेदवार माधवी लता यांनी मुस्लिम महिला मतदारांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भातील एक व्हीडिओ समोर आला आहे. एका मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी तपासणी केली. या व्हिडीओमुळे आता वाद होण्याची शक्यता आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माधवी लता बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलांना पडताळणीसाठी त्यांचा ‘निकाब’ किंवा चेहऱ्यावरील बुरखा काढून टाकण्यास सांगत होत्या. “बुरखा वर करा” असं माधवी लता महिलांना म्हणत असल्याचं व्हिडीओतून ऐकू येतंय. माधवी लता त्यांची मतदार ओळखपत्रे तपासत असताना त्यांच्या बुरख्याकडे हातवारे करत होत्या. तसंच, “तुम्ही हे मतदार कार्ड किती वर्षांपूर्वी बनवले आहे?”, असा प्रश्नही त्यांनी केला.

हेही वाचा >> VIDEO : धुळ्यातील सभेत अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना विचारले पाच प्रश्न; म्हणाले, “हिंमत असेल तर…”

मतदार कार्डसह आधार कार्डही तपासले

मतदार कार्ड तपासून झाल्यानंतर त्यांनी महिला मतदारांचे आधार कार्डही तपासले. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रियाही दिली. त्या म्हणाल्या, “मी एक उमेदवार आहे. कायद्यानुसार उमेदवाराला फेस मास्कशिवाय ओळखपत्र तपासण्याचा अधिकार आहे.”

“मुस्लिम महिलांना त्यांचे बुरखे काढायला सांगणे यात काही चुकीचं नाही, कारण मी सुद्धा एक महिला आहे”, असंही त्या पुढे म्हणाल्या. “मी पुरुष नाही, मी एक स्त्री आहे. त्यामुळे मी नम्रतेने त्यांना विनंती केली मी त्यांचं ओळखपत्र तपासू शकते का? जर एखाद्याला त्यातून मोठा मुद्दा बनवायचा असेल तर याचा अर्थ ते घाबरले आहेत”, असं त्या म्हणाल्या.

पोलिसांत गुन्हा दाखल

हा व्हिडीओ व्हायरल होताच लताविरुद्ध मलकपेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रामनवमीच्या मिरवणुकीत मशिदीच्या दिशेने बाण सोडण्याच्या कृतीची नक्कल करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तेव्हाही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धार्मिक भावना दुखावणाऱ्या हेतुपुरस्सर कृत्ये करणाऱ्या २९५ अ सह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. या हाय-प्रोफाइल जागेवरून माधवी लता हे हैदराबादचे विद्यमान खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि ज्येष्ठ BRS नेते गद्दम श्रीनिवास यादव यांच्या विरोधात लढत आहेत.