अयोध्येतील राम मंदिरानंतर आता बिहारच्या सीतामढी येथे माता सीतेचे भव्य मंदिर उभारलं जाईल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. तसेच मंदिराच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेस आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर टीकाही केली. ते बिहारमधील एका प्रचारसभेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमंक काय म्हणाले अमित शाह?

“पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर बांधले. आता केवळ माता सीतेचे मंदिर बाकी आहे. हे राहिलेलं काम आम्ही लवकरच पूर्ण करू. बिहारच्या सीतामढी येथे माता सीतेचे भव्य मंदिर उभारले जाईल”, असं आश्वासन अमित शाह यांनी दिले.

मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर केली टीका

पुढे बोलताना मंदिराच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसवर टीकाही केली. “जे लोक स्वत:ला रामापासून दूर ठेवतात, ते लोक कधीची माता सीतेचे मंदिर बांधू शकत नाही. हे मंदिर केवळ पंतप्रधान मोदी बांधू शकतात. कारण भाजपा कधीही वोट बॅंकेचं राजकारण करत नाही. विशिष्ट धर्माचे लोक आपल्याला मतदान करतील की नाही, याचा विचार आम्ही करत नाही”, असेही ते म्हणाले.

लालूप्रसाद यादव यांनाही केलं लक्ष्य

यावेळी बोलताना त्यांनी लालूप्रसाद यादव यांनाही लक्ष्य केलं. “स्वत:च्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी लालूप्रसाद यादव हे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांनी आजपर्यंत केवळ मागासवर्गीयांच्या विरोधात राजकारण केलं. काँग्रेस आणि आरजेडीने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याचा विचार कधीच केला नव्हता. मात्र, मोदी सरकारने ते करून दाखवले”, अशी टीका त्यांनी केली.

सीतमढी येथे २० मे रोजी मतदान

दरम्यान, बिहारच्या सीतामढी येथे २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने बिहारमध्ये ४० पैकी ३९ जागा विजय मिळवला होता.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bihar rally amit shah promise to build grand sita temple in sitamarhi spb