नवी दिल्ली : उष्णतेची लाट असूनही शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६२.३७ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांमध्ये सरासरी ५७.८२ टक्के मतदानाची नोंद झाली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ७० टक्के मतदान झाले होते. त्यातुलनेत यावेळी ७ टक्के कमी मतदान झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024 : सासरे आणि दोन सुना परस्परांच्या विरोधात

पश्चिम बंगाल व मणिपूरमध्ये काही ठिकाणे वगळता १९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान झाले. लोकसभेसह सिक्कीम आणि अरुणाचल राज्यांच्या विधानसभेसाठी मोठया प्रमाणवर मतदान झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या शुक्रवारी रात्री ९ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार त्रिपुरामध्ये सर्वाधिक ८०.१७ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये ७७.५७ टक्के तर, मणिपूरमध्ये ६९.१३ टक्के मतदान झाले. बिहारमध्ये सर्वात कमी ४८.५० टक्के मतदान झाले.   

० मतदानाचा टक्का (आकडेवारी रात्री ९ वाजेपर्यंत)

अंदमान-निकोबार- ५६.८७

अरुणाचल प्रदेश- ६७.१५

आसाम- ७२.१०

बिहार-४८.५०

छत्तीसगढ-६३.४१

जम्मू-काश्मीर- ६५.०८

लक्षद्वीप-५९.०२

मध्य प्रदेश-६४.७७

महाराष्ट्र- ५५.३५

मणिपूर-६९.१३

मेघालय- ७४.२१

मिझोराम-५४.२३

नागालँड-५६.९१

पुडुचेरी-७३.५०

राजस्थान-५६.५८

सिक्कीम-६९.४७

तामीळनाडू-६५.१९

त्रिपुरा-८०.१७

उत्तर प्रदेश-५८.४९

उत्तराखंड-५४.०६

पश्चिम बंगाल-७७.५७

पश्चिम बंगाल, मणिपूरमध्ये हिंसक घटना

कूचबिहार जिल्ह्यातील सीतलकुचीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा व मतदारांना धमकावल्याचा तृणमूलने आरोप केला आहे. मणिपूरमध्ये थामनपोकपी येथील मतदान केंद्राजवळ काही हल्लेखोरांनी गोळीबार केला. इरोइसेम्बा मतदान केंद्रावरही हिंसाचार झाल्याचे समजते.

नितीन गडकरी, किरेन रीरिजू, अनिल बलुनी, भूपेंद्र यादव, अर्जुन मेघवाल, जितेंद्र सिंह, सर्बानंद सोनोवाल आदी केंद्रीय मंत्र्यांसह संजीव बालियान, अन्नामलाई, जितीन प्रसाद आदी भाजप नेते तसेच, राहुल गांधी, कणीमोळी, गौरव गोगोई आदी ‘इंडिया’च्या नेत्यांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रांमध्ये कैद झाले आहे.

ठळक वैशिष्टय़े

० छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागांमध्ये मतदान शांततेत पार पडले. बस्तरमधील ५६ गावांमध्ये पहिल्यांदाच मतदान केंद्र उभारण्यात आली होती. त्यामुळे इथल्या मतदारांना आपापल्या गावामध्ये मतदान करता आले.

० महाराष्ट्रातील गडचिरोली-चिमूर मतदारसंघामध्ये हेमलकसा मतदार केंद्रावर स्थानिक आदिवासी बोलीमध्ये निवडणुकीसंदर्भातील माहिती उपलब्ध करण्यात आली.

० बिहारमधील बोधगयामध्ये बौद्ध भिक्खू मतदान केल्यानंतर बोटांना लावलेली शाई अभिमानाने दाखवत होते.

० अंदमान-निकोबार बेटांवर आदिवासी समाजानेही मोठया प्रमाणावर  मतदार केले. ग्रेट निकोबारच्या शॉम्पेन जमातीने प्रथमच मतदान केले.

० अरुणाचल प्रदेशात वृद्ध महिलेने घरीच्या घरी मतदान करता येणे शक्य असूनही डोंगरावर असलेल्या मतदान केंद्रात जाऊन मतदान केले.

० नागालँडमध्ये मतदार रंगीबेरंगी पोशाखात मतदान केंद्रांवर मतदानासाठी आले होते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2024 phase 1 of lok sabha polls registers 62 37percent polling despite heatwave zws
Show comments