पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. राष्ट्रपतींनी मला सरकार स्थापन करायला सांगितले असून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आहे असे मोदींनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर सांगितले.

राष्ट्रपतींनी मोदींना मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांची नावे आणि राष्ट्रपती भवनातील शपथविधीची तारीख आणि वेळ कळवायला सांगितली आहे. देशाने मला मोठा जनादेश दिले आहे आणि जनादेशसोबत लोकांच्या अपेक्षाही असतात. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा माझ्या सरकारचा मंत्र असून हा मंत्रच भारताच्या प्रत्येक भागामध्ये विकासाचा मार्ग दाखवेल.

मी पुन्हा एकदा देशातील जनतेचे आभार मानतो. नवे सरकार लोकांची स्वप्ने, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करेल असे आश्वासन देतो असे मोदी राष्ट्रपती भवनाबाहेर प्रसारमाध्यमांनी बोलताना सांगितले.

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. भाजपा संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्याचे पत्र शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना दिले. एनडीएच्या घटक पक्षांच्या पाठिंब्याचे पत्रही राष्ट्रपतींना देण्यात आले. प्रकाश सिंग बादल, राजनाथ सिंह, नितीश कुमार, राम विलास पासवान, सुषमा स्वराज, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी हे एनडीएचे नेते राष्ट्रपतींच्या भेटीसाठी गेले होते.