Viral Vada pav video : मुंबई आणि वडापाव हे समीकरण अद्वितीय आहे. मुंबईतील जवळपास प्रत्येक व्यक्ती हा वडापाव प्रेमी आहे, असे म्हटले तरी हरकत नाही. मात्र, या वडापावबद्दलचे प्रेम आता फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाहीये. दिल्लीसारख्या मोठ्या ते बऱ्याच लहान शहरांमध्ये आता वडापाव विकला आणि आवडीने खाल्ला जातो.
मात्र, सध्या पदार्थांबरोबर केल्या जाणाऱ्या प्रयोगांमध्ये बिचाऱ्या वडापावचादेखील बळी गेला आहे. असे म्हणण्या मागचे कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ. इन्स्टाग्रामवरील foodpandits नावाच्या अकाउंटने नुकत्याच ‘चॉकलेट चीज’ वडापावचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आता नाव ऐकूनच अनेकांच्या अंगावर काटा आला असेल. मात्र, हा वडापाव नेमका कसा तयार केला आहे ते पाहू.
व्हिडीओच्या सुरुवातीला सर्व प्रस्तावना देऊन झाल्यावर, व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने वडापाव बनवणाऱ्या स्त्रीला, “असा वडापाव खरंच असतो का?” असा प्रश्न विचारला. त्यावर ती स्त्री अगदी आत्मविश्वासाने “हो असतो ना, चॉकलेट चीज वडापाव मुलांना खूप आवडतो” असे उत्तर देते. पुढे हा वडापाव कसा तयार होतो आणि त्यात काय घातले जाते हे सांगितले आहे. सर्वप्रथम क्रीम बिस्किटं बेसनाच्या पिठात घोळवून तळली जातात. नंतर पावावर चॉकलेट सिरप घालून त्यावर चीज किसले जाते.
पुढे त्या किसलेल्या चीजच्या थरावर बिस्किटांचे तुकडे घालून, त्यावर तळलेला बिस्कीट वडा ठेवला जातो. आता टोस्टरला बटर लावून, त्यामध्ये या वडापावला कुरकुरीत होईपर्यंत टोस्ट केले जाते. वडापाव टोस्ट करून झाल्यांनतर त्याचे मधोमध दोन भाग केले जातात. शेवटी सजावटीसाठी वडापाववर पुन्हा एकदा चॉकलेट सिरप आणि किसलेल्या चीजचा थर घातला जातो. त्यावर चॉकलेट चिप्स आणि चॉकलेट बिस्कीटचा रोल ठेवून तयार झालेला ‘चॉकलेट चीज वडापाव’ खाण्यासाठी दिला जातो.
हा पदार्थ तयार होत असताना व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने त्या स्त्रीला, “हा प्रयोग करताना भीती नाही वाटली का?” असा प्रश्न करतो. त्यावर ती स्त्री अगदी निरागसपणे “नाही” असे उत्तर देते. या व्हिडीओमध्ये दाखवल्या गेलेल्या वडापाववर नेटकरी काय म्हणतात पाहू.
“मुंबईकरांना हे अजिबात सहन होणार नाहीये.. कृपया, असे व्हिडीओ दाखवून आमच्या भावना दुखवू नका”, असे एकाने लिहिले आहे.
“हा काय घाणेरडा प्रकार बनवला आहे?” असे दुसऱ्याने लिहिले.
“वडापावचा सत्यानाश केला आहे”, असे तिसऱ्याने म्हटले.
“जीव गेला तरी चालेल, पण हे नाही खाणार”, असे चौथ्याने म्हटले.
“फुकट मिळालं तरी नाही खाणार”, असे पाचव्याने लिहिले आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @foodpandits नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ११९K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.