लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. महाराष्ट्रातील मुंबईमधील सहा मतदारसंघ तसेच भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे, ठाणे, कल्याण, पालघर, या १३ मतदारसंघात आज मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान झालं आहे. देशात आज (२० मे) सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशात ४९ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं.

यामध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात एकूण ५६. ६८ टक्के मतदान झालं. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७३ टक्के मतदान झालं आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदान झालं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यांमध्ये दुसऱ्या राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे.

हेही वाचा : “नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरु झालंय, ४ जूननंतर…”, संथ गतीने मतदान होण्याच्या आरोपाला फडणवीसांचं प्रत्युत्तर!

महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात किती मतदान झालं?

नाशिक- ५१.१६ टक्के
पालघर – ५४.३२ टक्के
ठाणे – ४५.३८ टक्के
धुळे- ४८.८१ टक्के
भिवंडी- ४८.८९ टक्के
दिंडोरी – ५७.०६ टक्के
कल्याण – ४१.७० टक्के
मुंबई उत्तर पूर्व – ४८.६७ टक्के
मुंबई उत्तर – ४६.९१ टक्के
मुंबई दक्षिण मध्य – ४८.२६ टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – ४७.७९ टक्के
मुंबई दक्षिण – ४४.२२ टक्के
मुंबई उत्तर मध्य – ४७.३२ टक्के

कोणत्या राज्यात किती टक्के मतदान झाले?

देशात आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. यामध्ये एकूण ४९ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात एकूण ५६.६८ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७३ टक्के तर महाराष्ट्रात सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदान झाले आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये ५५.८० टक्के, बिहारमध्ये ५२.३५ टक्के, झारखंडमध्ये ६१.९० टक्के, ओडिशामध्ये ६०.५५ टक्के, जम्मू आणि काश्मीरमध्ये ५४.२१ टक्के आणि लडाखमध्ये ६७.७५ टक्के मतदान झाले आहे.

मुंबईत काही मतदारसंघात संथगतीने मतदान

मुंबईतील सहा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. यामध्ये मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात मतदान झाले. मात्र, अनेक मतदान केंद्रावर संथगतीने मतदान पार पडल्यामुळे मतदारांची मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, आज महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.