इम्फाळ :  मणिपूरमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६७.४६ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी गोळीबार आणि धमकावण्याच्या घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  राज्यातील ६० पैकी ३२ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या इनर मणिपूर लोकसभा मतदारसंघात ७१.०१ टक्के मतदानाची नोंद झाली, तर २८ पैकी १५ विधानसभा मतदारसंघ मिळून बनलेल्या आउटर मणिपूर मतदारसंघात ६१.१२ टक्के मतदान झाले.

इनर मणिपूरअंतर्गत येणाऱ्या थौबल जिल्ह्यातील वांगखेम येथे सर्वाधिक ८२.४१ टक्के मतदान नोंदवले गेले. नागा व कुकी अशा दोन्ही समुदायांचे मतदार असलेल्या आउटर मणिपूरमधील चंदेल येथे ८५.५४ टक्के मतदान झाले.

हेही वाचा >>> अल्पवयीन बलात्कारपीडितेची गर्भपातासाठी याचिका; सर्वोच्च न्यायालयाचे तातडीने, वैद्यकीय तपासणीचे निर्देश

इनर मणिपूर मतदारसंघात अनेक ठिकाणी गोळीबार आणि धमकावण्याच्या घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इम्फाळ पूर्व जिल्ह्यात खुराई मतदारसंघातील मोइरांगकाम्पू साजेब येथील एका मतदान केंद्राजवळ उभ्या असलेल्या ६५ वर्षांच्या एका इसमावर अनोळखी सशस्त्र लोकांनी गोळया झाडल्या. यात जखमी झालेल्या या इसमाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

बिष्णुपूर जिल्ह्यात मोइरांग विधनसभा मतदारसंघात येणाऱ्या थमनापोक्पी येथील एका मतदान केंद्राजवळ सशस्त्र लोकांनी हवेत गोळीबाराच्या अनेक फैरी झाडल्यामुळे मतदारांना पळून जावे लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा कुमक तेथे पाठवण्यात आली. अनोळखी सशस्त्र लोकांनी निरनिराळया ठिकाणी एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या निवडणूक एजंटना धमक्या दिल्या आणि त्यांना मतदान केंद्रातून निघून जायला सांगितले.