लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तिसरा टप्पा रविवारी संपला. आता चौथ्या टप्प्यासाठी प्रचारसभांचा धडाका सुरु झाला आहे. शिवसेनेत प्रवेश केलेला अभिनेता गोविंदा हा देखील प्रचार करताना दिसतो आहे. महायुतीच्या प्रचारासाठी गोविंदा रोड शो करताना दिसला. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी गोविंदा आला आणि त्याचा हा दौरा चर्चेत राहिला. कारण पत्रकारांशी संवाद साधताना गोविंदा श्रीरंग बारणे हे नावच विसरला. याचीच चर्चा होते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या रोड शोसाठी गोविंदा रविवारी मावळ लोकसभा मतदारसंघात आला होता. रोड शो झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना गोविंदा उपस्थितांची नावं घेत होता. त्यावेळी श्रीरंग बारणे त्याच्या शेजारीच बसले होते. गोविंदाला त्याचं नाव आठवत नव्हतं. शेवटी भाजपाच्या आमदार उमा खापरे यांना श्रीरंग अप्पा बारणे हे नाव त्यांना सांगावं लागलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे पण वाचा- गोविंदाच्या भाचीने सोडला हिंदू धर्म? अभिनेत्री रागिनी खन्ना धर्मांतराच्या ‘त्या’ पोस्टबद्दल म्हणाली, “मी माझा धर्म…”

गोविंदाला भाजपा आमदार उमा खापरेंनी श्रीरंग बारणे हे नाव सांगितलं

गोविंदाला आमदार उमा खापरे यांनी श्रीरंग बारणेंचं नाव सांगितलं. त्यानंतर गोविंदा श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी आलो आहे असं पत्रकारांना उद्देशून म्हणाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक जण उमेदवाराचं नाव लक्षात नसेल गोविंदाला बोलवून काय साध्य झालं? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. कारण या दृश्यांमध्ये श्रीरंग बारणे यांचा चेहरा पडल्याचं स्पष्ट दिसतं आहे.

श्रीरंग बारणे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गोविंदाच्या हस्ते झालं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ज्यांच्या प्रचारासाठी गोविंदा आला, त्या बारणेंचे नावचं गोविंदाला माहीत नसल्याचे समोर आले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची चर्चा चांगली रंगली आहे.

मावळमध्ये १३ मे रोजी मतदान

मावळ मतदारसंघात लोकसभेचं चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मावळात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कांटे की टक्कर होणार आहे. दोन्ही उमेदवारांच्या गाठीभेटी सुरू असून मावळच्या आखाड्यात कोणता उमेदवार बाजी मारेल हे ४ जूनला समजणार आहे. परंतु काळ्या मातीतील पैलवानांनी महाविकास आघाडीचे संजोग वाघिरेंना पाठिंबा दिला आहे.

गोविंदा महायुतीचा स्टार प्रचारक

अभिनेता गोविंदाने २८ मार्चला शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गोविंदाने शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. आपल्याला कुठल्याही पदाची किंवा तिकिटाची अपेक्षा नाही असं गोविंदाने तेव्हा स्पष्ट केलं होतं. मात्र महायुतीसाठी गोविंदा हा स्टार प्रचारकाच्या भूमिकेत आहे. अशात गोविंदाला श्रीरंग बारणेंचं नाव आठवलं नाही याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maval lok sabha constituency govinda forgot srirang barane name scj
Show comments