लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), द्रमुक, आप आणि तृणमूलसह इंडिया आघाडीतील पक्षांवर टीका करत आहेत. महाराष्ट्रातील प्रचारादरम्यान, त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा ‘नकली शिवसेना’ असा उल्लेख केला आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘नकली राष्ट्रवादी’ म्हणून उल्लेख केला आहे. अशातच त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंबाबत सौम्य आणि मित्रत्वाची भाषा वापरली. पाठोपाठ आज (१० मे) त्यांनी नंदूरबारमधील सभेतून शरद पवारांना भाजपाप्रणित एनडीएबरोबर येण्याची ऑफर दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य करताना थेट शरद पवारांनाच एनडीएमध्ये येण्याची मोठी ऑफर दिली आहे.

मोदींच्या ऑफरवर आता काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नंदुरबारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर येऊन भाषण केलं. या भाषणावेळी त्यांनी एक गोष्ट स्पष्ट करायला हवी होती की ‘आम्ही आता परत सत्तेवर येत नाही. आम्ही हरलोय’. मोदींना पराभवाची चाहूल लागल्यामुळेच ते अशी वक्तव्ये करत सुटले आहेत.

नाना पटोले म्हणाले, मोदींनी आज स्पष्ट केलं असतं की ते ही निवडणूक हरतायत, तर कदाचित महाराष्ट्राने त्यांना माफ केलं असतं. परंतु, त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीवर येऊन शरद पवारांना ऑफर दिली आहे. एका बाजूला शिवसेनेला नकली म्हणायचं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नकली म्हणायचं आणि आता त्याच शिवसेनेला, राष्ट्रवादीला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करायचा, याचा अर्थ मोदींना कळून चुकलंय की ते आता सत्तेच्या बाहेर चालले आहेत.

हे ही वाचा >> “संविधान बदलाच्या चर्चेचा निवडणूक प्रचारात महायुतीला फटका”, मंत्री उदय सामंत स्पष्टच म्हणाले…

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींनी १४ वेळा महाराष्ट्राचा दौरा केला होता. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी तब्बल २९ दौरे केले आहेत. त्यांच्या सभांना पैसे देऊन लोकांना आणलं जात आहे. हे सर्व चित्र पाहता मोदी सत्तेतून बाहेर फेकले जातायत हे स्पष्ट होतंय आणि मोदींना देखील त्याची कल्पना आहे