२०१९ मध्ये शिवसेनेने भाजपाबरोबरची तीन दशकांपासूनची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करून राज्यात सरकार बनवलं. तर उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून महाराष्ट्रात सातत्याने मोठमोठे राजकीय भूकंप होत आहेत. महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर झालं आहे. जून २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडून दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळा गट बनवला. या गटाने भाजपाला आपल्याबरोबर घेत राज्यात सरकार बनवलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एका वर्षाने म्हणजेच जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४१ आमदारांना आपल्याबरोबर घेऊन वेगळा गट बनवला. या गटासह ते शिवसेना-भाजपाच्या सरकारमध्ये सहभागी झाले. महाराष्ट्रातील भाजपाचे विरोधक, शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष सातत्याने या राजकीय घडामोडींसाठी भाजपाला जबाबदार धरत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्याचा सातत्याने आरोप केला जातोय. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनीदेखील ‘मी दोन पक्ष फोडून आलोय’ असं वक्तव्य केल्यापासून विरोधक भाजपावर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपाने हे दोन पक्ष फोडल्याने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाप्रती सहानुभूती आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. मोदी यांनी सोमवारी (२९ एप्रिल) नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून युती आणि आघाडीची सरकारे बनत राहिली आहेत. परंतु, महाराष्ट्रात कधीही कुठल्याही एका पक्षाची सत्ता आली नाही. शरद पवार अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनीदेखील कधी एका पक्षाचं सरकार आणलं नाही. अनेक दशकांनंतर महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री पाच वर्षे टिकला. देवेंद्र फडणवीस हे सलग पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. खूप मोठ्या कालावधीनंतर राज्यातील एखाद्या नेत्याने मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यासह त्यांच्या सरकारवर कुठलाही डाग नव्हता. मात्र यांच्या (मविआ) राजकारणामुळे फडणवीसांना पद गमवावं लागलं. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची सहानुभूती आमच्याबरोबर असायला हवी. जे लोक आमच्याबरोबर निवडणूक लढले. ज्यांनी आमच्याबरोबर महाराष्ट्राच्या जनतेकडे मतं मागितली. त्यांनीच मुख्यमंत्री बनण्यासाठी वैयक्तिक महत्त्वकांक्षेपायी अहंकारी वृत्तीने निर्णय घेतला. या लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून असलेली युती तोडली. या लोकांबाबत (उद्धव ठाकरे) महाराष्ट्रातील जनतेच्या मनात प्रचंड राग आहे आणि भाजपाप्रती सहानुभूती आहे.

हे ही वाचा >> ठरलं! अरविंद सावंतांना टक्कर देणार यामिनी जाधव, शिंदे गटाकडून दक्षिण मुंबईत लोकसभेची उमेदवारी जाहीर

नरेंद्र मोदी म्हणाले, शिवसेनेत जे वादळ उठलं तेच वादळ राष्ट्रवादीत उठलं होतं हे स्पष्ट दिसतंय. या लोकांनी त्यांच्या कुटुंबातील लोकांनाच प्राथमिकता दिली, इतरांना सन्मान दिला नाही. तुम्ही तुमच्याबरोबरच्या लोकांना सन्मान दिला नाही तर अशा अडचणी निर्माण होतात. शरद पवारांसमोरच्या अडचणी कौटुंबिंक आहेत. पुतण्याला सांभाळावं की मुलीला असा त्यांच्यासमोर प्रश्न होता. शिवसेनेतही तशीच स्थिती आहे. आपल्या घरातील लोकांव्यतिरिक्त दुसरा सक्षम नेता वर येण्यापेक्षा आपण आपल्या मुलाला मोठं करायचं असं त्यांचं धोरण होतं. त्यामुळेच शिवसेनेत भांडण निर्माण झालं होतं. परंतु, मला असं वाटतं की, आपला देश अशा प्रकारच्या कौटुंबिक भांडणांचा तिरस्कार करतो. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबाबत लोकांच्या मनात सहानुभूती नाही. प्रसारमाध्यमांनीदेखील त्यांना अशा प्रकारे सहानुभूती मिळवून देण्याचा प्रयत्न करू नये. तुमच्या घरातली भांडणं तुम्ही घरातच मिटवा. त्या भांडणांपायी राज्य उद्ध्वस्त करू नका.