२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची अनेक वर्षांपासूनची युती तोडली. तसेच त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी बनवून राज्यात सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष चालू आहे. दरम्यानच्या काळात शिवसेनेत उभी फूट पडली आणि पक्षाचे दोन गट तयार झाले. यापैकी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मोठा गट भाजपाबरोबर गेला आणि त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तर शिवसेनेचा दुसरा गट (उद्धव ठाकरे) आणि भाजपातील संघर्ष चालूच आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना-भाजपातील संघर्षावर आणि दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमधील जिव्हाळ्याच्या संबंधांवर भाष्य केलं. मोदी यांनी टीव्ही ९ नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासहेब ठाकरे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत आणि माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. ते आजारी होते तेव्हा मी लगेच त्यांना फोन केला. मी वहिनींना (उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे) फोन करून उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करायचो. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही काय सल्ला द्याल? त्यावर मी त्यांना म्हटलं की आधी उपचार करून घ्या, बाकीच्या चिंता सोडा. आधी शरीर जपा. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा सन्मानच करणार आहे. ते काही माझे शत्रू नाहीत. उद्या त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना सर्वात आधी मदत करणारा मीच असेन. परंतु, हे सगळं कुटुंब म्हणून… आमच्या राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी कुटुंब म्हणून मी त्यांच्याबरोबर असेन.

मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी जगेन. बाळासाहेबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. ते कर्ज मी कधीच विसरू शकत नाही. आज आम्ही ज्या शिवसेनेबरोबर बसलो आहोत त्यांच्यापेक्षा आमचे आमदार जास्त आहेत. तरीदेखील राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री विराजमान झाले आहेत. ही माझी बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली आहे.

हे ही वाचा >> “मी करतो ते वाट्टोळं आणि तुम्ही…”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला; ‘त्या’ घडामोडींचा दाखला देत म्हणाले…

नरेंद्र मोदी म्हणाले, मागील निवडणुकीत (महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४) आम्ही आणि शिवसेना वेगवेगळे लढलो होतो. त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात एकही शब्द बोललो नाही. उद्धव ठाकरे यांनी मला कितीही शिव्या दिल्या तरी मी त्यांच्या विरोधात काहीच बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांप्रती श्रद्धा आहे. उद्धव ठाकरेंच्या कौटुंबिक समस्या असतील तर तो काही माझा विषय नाही. मात्र मी बाळासाहेबांचा आदर करतो आणि आयुष्यभर करत राहीन.